बसफेरीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:21 AM2021-07-08T04:21:34+5:302021-07-08T04:21:34+5:30

राजापूर : जैतापूर येथून सुटणारी जैतापूर - सांगली ही बसफेरी सुरु करण्याची मागणी जैतापूर ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. ही ...

Demand for bus service | बसफेरीची मागणी

बसफेरीची मागणी

googlenewsNext

राजापूर : जैतापूर येथून सुटणारी जैतापूर - सांगली ही बसफेरी सुरु करण्याची मागणी जैतापूर ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. ही गाडी यापूर्वी बारमाही सुरु होती. परंतु, ही गाडी बंद झाल्याने शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. ही गाडी सुरु करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.

रस्त्याचे काम अपुरे

दापोली : तालुक्यातील दाभोळ बाजारपेठेतील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पहिल्याच पावसाने या रस्त्यावरील खड्डे अधिक वाढले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना त्रासदायक होत आहे. सध्या पावसाळा सुरु असल्याने या खड्ड्यांचे आकारही वाढले आहेत. सध्या रस्ता दुरुस्तीला मुहूर्त मिळेल, असे वाटत नाही.

बस आजपासून सुरु

राजापूर : येथील एस. टी. आगाराने गुरुवार, ८ जुलैपासून आंबोळगड - कोल्हापूर ही बस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी ७ वाजता आंबोळगड येथून ही बस सुटणार असून, नाटे - धाऊलवल्ली राजापूर - पाचल अणुस्कुरामार्गे कोल्हापूरला जाणार आहे. या फेरीचा लाभ घेण्याचे आवाहन आगारप्रमुख राजेश पाथरे यांनी केले आहे.

बामणोलीत वृक्षारोपण

चिपळूण : तालुक्यातील श्री चंडकाई वाघजाई ग्रामदेवता मंदिर ट्रस्ट, बामणोली मैत्रीबंद समूह आणि पर्यावरणप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने बामणोली येथे रविवार, दि. ११ जुलै रोजी सकाळी ८ ते ११ यावेळेत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ग्रामस्थ आणि विद्यार्थी अशा दोन गटात हा उपक्रम राबविला जाणार आहे.

दुबार पेरणीचे संकट

दापोली : गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. पाणथळ जागेतील लावणी झाली असली तरी आता रोपेसुद्धा सुकू लागली आहेत. त्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे. अजूनही पावसाची हीच स्थिती राहिली तर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे.

उमेश मोहिते यांना पुरस्कार

रत्नागिरी : गोंदिया येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धेत रत्नागिरीतील उमेश मोहिते यांना उत्कृष्ट पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या ‘नारीशक्तीला सलाम’ या कवितेची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

विहिरीची स्वच्छता

देवरुख : येथील नगर पंचायत क्षेत्रातील परशरामवाडीमधील सार्वजनिक विहिरीची स्वच्छता करुन विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. परिसरातील झाडांचा पालापाचोळा विहिरीत पडल्याने पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित झाले होते. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. परंतु, या वाडीतील विद्यार्थ्यांनी विहिरीची स्वच्छता केली आहे.

ऊन - पावसाचा खेळ

रत्नागिरी : सध्या पावसाचा श्रावण महिन्याप्रमाणे ऊन - पावसाचा खेळ सुरु झाला आहे. या आठवड्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील लावण्यांची कामे रखडली आहेत. दि. ९ जुलैनंतर मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त होत असल्याने आता शेतकऱ्यांचे पावसाकडे लक्ष लागले आहे.

परीक्षेचा निकाल रखडला

देवरुख : सार्वजनिक आरोग्य विभागाने ५० टक्के पदभरतीची परीक्षा कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊन सुरु असताना घेतली होती. मात्र, चार महिने होऊन गेले तरीही याचा निकाल अजून लागलेला नाही. ग्रामविकास विभागांतर्गत ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यामुळे या परीक्षेचा निकाल कधी लागणार आणि पदभरती कधी होणार, याची प्रतीक्षा आहे.

रस्त्याशेजारी चिखल

रत्नागिरी : शहरात रस्त्यालगत चर खणल्याने पावसाळ्यात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. शहरातील मारुती मंदिर ते माळनाका भागात मुख्य रस्त्याच्या शेजारी चर खणून ते थातूरमाातूररित्या भरण्यात आले आहेत. पावसाळ्यात या चरांमध्ये पाणी भरल्याने रस्त्यालगत चिखलाचे साम्राज्य आहे. दुकानांसमोरही हीच स्थिती असल्याने नागरिकांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Demand for bus service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.