नुकसानभरपाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:33 AM2021-05-20T04:33:35+5:302021-05-20T04:33:35+5:30
आवाशी : नुकत्याच आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली ...
आवाशी : नुकत्याच आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. तर अनेकांचे गोठे जमीनदोस्त झाले आहेत. त्याचप्रमाणे बागायतदारांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आणि बागायतदार यांच्याकडून भरपाईची मागणी होत आहे.
निसर्गप्रमाणे भरपाई द्या
रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाने रत्नागिरी तालुक्यातील अनेक भागामध्ये घरांचे तसेच बागायत शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. त्यामुळे शासनाने या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी वेगळे निकष लावून भरपाई दिली होती, तशी भरपाई यावेळी द्यावी, अशी मागणी होत आहे.
वर्दळ रोडावली
पाली : शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले आहे. तसेच इतर जिल्ह्यांतील व्यक्तींना जिल्ह्यात येण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात येण्याकरिता ई-पासबरोबरच कोरोना निगेटिव्ह असल्याची चाचणी अनिवार्य करण्यात आल्याने सध्या जिल्ह्याकडे येणाऱ्या मार्गांवर वाहनांची वर्दळ कमी झाली आहे.
रस्ते सामसूम
चिपळूण : सकाळी ७ ते ११ या वेळेत अत्यावश्यक वस्तूंची दुकानेच सुरू ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे ११ नंतरही दुकाने बंद झाल्यानंतर रस्त्यांवर सामसूम झालेली दिसते. हार्डवेअरची दुकाने १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा वर्दळ वाढण्यास मदत होणार आहे.
महापुराचा धोका
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातून वाहणाऱ्या खाड्या व नद्यांमधील गाळ गेल्या अनेक वर्षांत उपसण्यात आलेला नाही. गाळ उपशाच्या मागणीकडे जिल्हा प्रशासनाबरोबरच पाटबंधारे विभागाकडूनही दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी पावसाचा जोर वाढल्यास तालुक्याला असलेला महापुराचा धोका कायम रहाणार आहे.