चिपळूण तालुकाध्यक्ष हटवण्याची मागणी
By Admin | Published: September 10, 2014 10:46 PM2014-09-10T22:46:54+5:302014-09-11T00:09:12+5:30
माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष यांना दिले निवेदन
चिपळूण : येथील तालुकाध्यक्षांच्या नेतृत्त्वाखाली काम करणे अवघड झाल्याने त्यांना बदलावे, अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व माजी खासदार नीलेश राणे यांच्याकडे केली आहे.
काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांचा मनमानीपणा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली काम करणे सर्वांनाच असह्य आहे. तालुकाध्यक्षपद मिळाल्यापासून पक्षाची व पदाची ध्येयधोरणे बाजूला सारुन निव्वळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी सर्वसामान्यांना आणि मतदारांना अडचणीचे ठरेल, अशाच प्रकारची आंदोलने करणे, निव्वळ राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्याच कार्यकर्त्यांविरुद्ध बोलत राहाणे, शिवसेना व विरोधी पक्षाबाबत अवाक्षरही न काढणे, सेनेच्या पदाधिकाऱ्यांना कामे देणे, काम करणारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्ध षडयंत्र रचणे, एकाधिकारशाही करणे, कमिटी बॅनरवर दुसऱ्या पक्षाच्या व्यक्तीचा फोटो लावून निव्वळ प्रगतीपुस्तक भरण्याचे काम करणे, सतत पक्षविरोधी कारवाया करणे, कामे देतो, सांगून पैसे उकळणे, कार्यकर्त्यांना धमकावणे, पक्षवाढीचा देखावा उभा करुन वाळू व्यावसायिक, कारखानदार, सरकारी कर्मचारी यांच्याकडून रक्कम घेणे, स्वार्थ साधणे, राणे यांच्याबद्दल खोटेनाटे सांगून कार्यकर्त्यांना दूर ठेवणे, गैरसमज पसरवणे, खोटी आमिषे दखवून कार्यक्रमासाठी उपस्थिती वाढविणे, इतर पदाधिकाऱ्यांनी घेतलेले कार्यक्रम अयशस्वी होतील, अशा कारवाया करणे अशा अनेक गोष्टी काँग्रेस श्रेष्ठींनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये सावंत यांनी ठराविक गावे सोडता कुठेही बूथ लावले नाहीत. अनेक गावात पक्षाचे बूथ अध्यक्षच नाहीत, ते केवळ कागदावर आहेत. गावागावातील वाडीवस्तीवरील मतदारांपर्यंत ते पोहचले नाहीत. साधे प्रचारपत्रही पोहोचले नाही. कोणत्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात घेतले नाही. अनेक ठिकाणी बूथच्या खर्चाची रक्कमही पोहचली नाही, अशा अनेक तक्रारी या निवेदनात आहेत. या पत्रावर लक्ष्मण खेतले, शहराध्यक्ष परिमल भोसले, उपनगराध्यक्ष लियाकत शाह, माजी नगराध्यक्ष अॅड. शांताराम बुरटे, माजी नगराध्यक्ष हेमलता बुरटे, माजी तालुकाध्यक्ष अॅड. जीवन रेळेकर, माजी उपनगराध्यक्ष गौरी रेळेकर, जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, युवक अध्यक्ष वैभव वीरकर, तालुका सरचिटणीस राजेंद्र शिंदे, सचिव राजेश वाजे, पाणी सभापती कबीर काद्री आदी १६० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)
पक्षवाढीसाठी कोणताही कार्यक्रम न करता केवळ पदाधिकाऱ्यांना दुखावण्याचे काम त्यांनी केले. अपमान सहन करुन केवळ आपल्याकडे पाहून आम्ही प्रामाणिकपणे काम करीत राहिलो. आपल्या पराभवाचे शल्य आम्हाला स्वस्थ बसू देत नाही. याची अनेक कारणे असतील. मात्र, तालुकाध्यक्षांचा हेकेखोरपणा हेही मोठे कारण आहे.
काँग्रेसचे अस्तित्त्व तालुक्यात नव्हते. त्या कठीण काळात आपण काँग्रेसरुपी आंब्याचे झाड लावले. आता हे झाड मोठे झाले आहे. त्यावर फळे लागल्याने दगड मारण्याचे काम सुरु झाले आहे. त्याला आपण फारशी किंमत देत नाही, असे प्रकार यापूर्वीही घडले असून, आपला पक्षश्रेष्ठींवर विश्वास आहे, असे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनी सांगितले.
माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष यांना दिले निवेदन.
तालुकाध्यक्षांच्या नेतृत्त्वाखाली काम करणे असह्य.
तालुकाध्यक्षांच्या धाकदपटशहाचा वाचला पाढा.