हद्दपारीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:22 AM2021-06-28T04:22:04+5:302021-06-28T04:22:04+5:30
खेड : तालुक्यातील आवाशीमधील भंगारवाल्या मोहरमच्या मुलाने चिपळूण शहरामध्ये एका परिचारिकेवर हल्ला करून, तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ...
खेड : तालुक्यातील आवाशीमधील भंगारवाल्या मोहरमच्या मुलाने चिपळूण शहरामध्ये एका परिचारिकेवर हल्ला करून, तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याला अटकही करण्यात आली आहे. या भंगारवाल्याची आवाशीमधून हकालपट्टी करण्याची मागणी मनसेने केली आहे.
लसीकरणाला प्रतिसाद
चिपळूण : नगरपरिषद चिपळूण व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्यामार्फत प्रभाग क्रमांक १३ मधील ६० वर्षेवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी व ४५ वर्षांवरील दिव्यांग व्यक्तींसाठी लसीकरण कार्यक्रम पाग मराठी शाहा येथे करण्यात आले. त्याला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
महामारीमध्ये मदतीचा हात
गुहागर : भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी उभा केलेल्या वैद्यकीय टीमने कोरोना काळात अग्रेसर राहून दुसऱ्या लाटेत रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या या सेवेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
व्यापारी अडचणीत
साखरपा : साखरपा गाव हे कंटेन्मेंट झोन जाहीर झाल्यामुळे बाजारपेठ बंद आहे. आधी लॉकडाऊन आणि आता कंटेन्मेंट झोन यामुळे सतत बंद असलेल्या बाजारपेठेचा फटका व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे. साखरपा बाजारपेठ अनेक दिवस बंद आहे.
चार गावे कोरोना हॉटस्पॉट
दापोली : तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येत उद्रेक दिसून आला. यामध्ये तालुक्यातील चार गावे हॉटस्पॉट तर दोन गावे आउटब्रेक असल्याबाबत तालुका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तालुक्यातील केळशीत ५६ तर करजगावात २५ रुग्ण आढळून आले.
रेल्वे प्रवाशांचे हाल
आरवली : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या हजरत निजामुद्दीन-मडगांव राजधानी सुपरफास्ट एक्स्प्रेसचे इंजिन उक्षी बोगद्याजवळ घसरल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या दरम्यान मंगळूर एक्स्प्रेस उक्षीतून मुंबईत परत फिरविण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.
जिल्हा परिषदेत अस्वच्छता
रत्नागिरी : मिनी मंत्रालय असणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषदेला काही वर्षांपूर्वी आयएसओ मानांकन मिळाले होते. त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी चांगलं काम करून राज्यामध्ये नावलौकिक मिळविला, परंतु त्यामध्ये सातत्य नसल्याने पुन्हा या जिल्हा परिषदेची स्थिती अस्वच्छतेच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
मांडवी जेटीवर गर्दी
रत्नागिरी : शहरातील गेटवे ऑफ रत्नागिरी मांडवी जेटीवर दुपारी अनेक तरुण-तरुणींनी समुद्राच्या लाटांचा मनमुराद आनंद घेतला. संपूर्ण जिल्हा कोरोनाच्या संकटात असताना, पुरेपूर ऑक्सिजन घेण्यासाठी तरुण-तरुणींनी मांडवी समुद्राला पसंती दिली असल्याची चर्चा सुरू होती.
रोगराई पसरण्याची भीती
देवरुख : शहरातील खालची आळी येथील सारण पक्के बांधकाम करून बंद करण्यात आल्याने, या परिसरातील वाहून येणारे पाणी बंद करण्यात आल्याने ते रस्त्यावरच साचते. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
स्वच्छतागृहाची स्वच्छता ठेवावी
दापोली : दाभोळ नाक्यावर बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाची स्वच्छता होत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दाभोळ येथील धक्क्यावर बंद विभागामार्फत स्वच्छतागृह बांधण्यात आले होते. या स्वच्छतागृहाची स्वच्छता करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे देण्यात आली होती.