मासळी बाजार दोन वेळा सुरू ठेवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:29 AM2021-05-01T04:29:59+5:302021-05-01T04:29:59+5:30
रत्नागिरी : कोरोना संसर्गामुळे शासनाकडून करण्यात आलेेल्या कडक लॉकडाऊनमुळे मच्छीमार समाजाच्या व्यवसायावर खूपच वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे सरकारने ...
रत्नागिरी : कोरोना संसर्गामुळे शासनाकडून करण्यात आलेेल्या कडक लॉकडाऊनमुळे मच्छीमार समाजाच्या व्यवसायावर खूपच वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे सरकारने त्वरित याेग्य ते स्पष्ट आदेश जारी करून मच्छीमार समाजाला दिवसातून दोन वेळा मासळी विक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र कृती समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्याकडे केली आहे.
शासनाच्या आदेशानुसार मासळी खरेदी-विक्री, वाहतूक करण्याची परवानगी आहे. मासळी विक्री सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत असा नियम आहे. मासेमारीचा केवळ ४० दिवसांचा हंगाम शिल्लक आहे. त्यानंतर ६१ दिवस मासेमारी बंद राहणार आहे. अशा वेळी संचारबंदीच्या काळात मासळी विक्री झाली नाही तर मासेमारी नौकांवर काम करणारे तांडेल, खलाशी यांचा दैनंदिन मेहनताना देणार कुठून, डिझेल, बर्फ, इत्यादी सामग्रीसाठी खर्च करणार कुठून, अशा अनेक आर्थिक संकटांत मच्छीमार व त्यावर अवलंबून असलेला मच्छीमार समाज अडचणीत आहे.
त्यासाठी किरकोळ व होलसेल मासळी विक्री बाजार तसेच बंदरांवर, जेटींवर पहाटे पाच ते दुपारी एक आणि सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत अशा दोन सत्रांत मासळी विक्री सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. तसेच नागरिकांना मार्केटमध्ये येण्या-जाण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या परवानग्या देता येत नसतील तर मासेमारी नौकेवरील संबंधित सर्व तांडेल, खलाशी यांची मेहनताना रक्कम ३१ मे अगोदर राज्य सरकारने देण्याची हमी द्यावी. मासेमार, मासे विक्रेता संबंधित सर्व कुटुंबाला चार महिन्यांचा म्हणून प्रतिकुटुंबास प्रतिमहिना २५ हजार रुपये भत्ता द्यावा. परराज्यांतील खलाशी यांना गावी जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक व्यवस्था करावी, याप्रमाणे व्यवस्था केल्यास मासेमारी व्यवसाय बंद करण्याचा विचार करू अथवा संचारबंदीमध्ये मागण्यांनुसार सवलत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्याकडे करण्यात आली आहे.