राजापुरात गणेशघाटाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:31 AM2021-04-08T04:31:04+5:302021-04-08T04:31:04+5:30
राजापूर : शहरातील बंगालवाडी परिसरातील नागरिकांनी वरचीपेठ ...
राजापूर : शहरातील बंगालवाडी परिसरातील नागरिकांनी वरचीपेठ येथील गणेशघाट व शासकीय विश्रामगृह येथे शेड उभारण्यात यावी, अशी मागणी आमदार राजन साळवी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यानुसार आमदार साळवी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, खारेपाटण यांच्याकडे मागणी केली आहे.
राजापूर शहरातून जाणाऱ्या मुंबई - गोवा महामार्गाचे काम सध्या वेगात चालू आहे. हे काम करीत असताना बंगालवाडी परिसरातील नागरिकांची सार्वजनिक शेड तोडण्यात आली आहे. गणेश विसर्जनवेळी या शेडमध्ये गणपती एकत्र आणण्याचा रिवाज होता. त्यामुळे हा रिवाज पुढे चालू राहण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे शेड उभारण्याची गरज आहे. तसेच अर्जुना नदीवर वरचीपेठे येथे जिल्ह्यातील सर्वात मोठा पूल उभारण्यात येत असल्याने येथील गणेश विसर्जनासाठी बांधण्यात आलेला गणेश घाट तोडण्यात आला आहे.
मुंबई - गोवा महामार्गाचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभाग, खारेपाटणच्या अखत्यारित येते. सध्या हे काम प्रगतीपथावर असल्याने शेड व गणेश घाटाचे कामही लवकर होणे गरजेचे आहे. त्यामुळे हे निवेदन आमदार राजन साळवी यांना देण्यात आले. याची दखल घेत आमदार साळवी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, खारेपाटण यांच्याकडे मागणी केली आहे.