जिल्ह्यातील व्यावसायिकांना लस उपलब्ध करून देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:31 AM2021-05-10T04:31:59+5:302021-05-10T04:31:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यातील व्यावसायिकांसाठी कोरोना लस उपलब्ध करून देण्याची मागणी रत्नागिरी जिल्हा व्यापारी महासंघातर्फे करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यातील व्यावसायिकांसाठी कोरोना लस उपलब्ध करून देण्याची मागणी रत्नागिरी जिल्हा व्यापारी महासंघातर्फे करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायराण मिश्रा यांना महासंघातर्फे निवेदन देण्यात आले आहे.
जिल्ह्यामध्ये ‘ब्रेक द चेन’अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. व्यापाऱ्यांचे अर्थचक्र संपूर्णपणे विस्कळित झालेले असतानाही, मानवी जीवनाला प्राधान्य देण्याची आपली भूमिका लक्षात घेऊन, जिल्ह्यातील सर्व व्यापारी याला सहकार्य करीत आहेत. मात्र, केवळ वैयक्तिक व्यापाऱ्यांचेच अर्थचक्र विस्कळीत न होता, त्यासोबतच संपूर्ण जिल्हा, राज्य आणि देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात विस्कळीत होत आहे. त्यामुळे, काही कालावधीनंतर बाजारपेठा आणि दुकाने सुरू करणे गरजेचे आहे.
‘ब्रेक द चेन’ संपल्यानंतर ज्यावेळी व्यापार सुरू होईल, त्यावेळी सर्व व्यापारी आणि कर्मचारी रोज अनेक ग्राहकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्यामार्फत कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना लस उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे़