वटपौर्णिमेसाठी आंबे, फणसाला मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:21 AM2021-06-24T04:21:57+5:302021-06-24T04:21:57+5:30
रत्नागिरी : गुरुवारी साजऱ्या होत असलेल्या वटपौर्णिमेसाठी फळांची मागणी वाढली आहे. कोरोनामुळे बहुतांश महिला गेल्या वर्षीपासून घरातच वडाच्या फांदीची ...
रत्नागिरी : गुरुवारी साजऱ्या होत असलेल्या वटपौर्णिमेसाठी फळांची मागणी वाढली आहे. कोरोनामुळे बहुतांश महिला गेल्या वर्षीपासून घरातच वडाच्या फांदीची पूजा करत असल्याने वडाची फांदी, आंबे, फणस यांची विक्री वाढली आहे.
पूजेसाठी आटीफणी, काळेमणी, हिरव्या बांगड्या, कुंकवाच्या डब्या, फळांचा वापर करण्यात येत असल्याने या वस्तू बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत्या. पूजेनंतर पुरोहित व ज्येष्ठ मंडळींना वाण देऊन आशीर्वाद घेतला जातो. वटपौर्णिमेनिमित्त बहुतांश महिला दिवसभर उपवास करतात. उपवासासाठी व वाण देण्यासाठी कच्चे, पिके गरे, आंबे, अननस, सफरचंद, मोसंबी, केळी, चिकू या फळांना मागणी होती.
यावर्षी तौक्ते वादळामुळे आंबा, फणसाचे खूप मोठे नुकसान झाले. त्यामुळे स्थानिक आंबा बाजारात नाही. परराज्यातील बदामी, बलसाड, केशर, दशहरी, तोतापुरी, लंगडा (राघू) आंबा विक्रीला आहे. बाजारपेठ सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंतच खुली असल्याने नोकरदार महिलांनी कार्यालयीन कामकाजाच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच खरेदी उरकली होती.