रेमडेसिवरची मागणी आता केवळ ३४ टक्केच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 05:41 PM2020-12-22T17:41:02+5:302020-12-22T17:42:31+5:30
Coronavirus Unlock Ratnagirinews- ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होऊ लागली आहे. आरोग्य विभागाकडून चाचण्या वाढविण्यात आल्याने तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासनाच्या मोहिमेची अंमलबजावणी प्रभावीपणे केल्याने रुग्णांचे निदान वेळेवर होत आहे. परिणामी उपचारासाठी रुग्ण वेळेवर दाखल होत आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने आता जिल्हा रुग्णालयात रेमडेसिवर इंजेक्शनची मागणी केवळ २३ टक्के तर जिल्ह्यात एकूण ३४ टक्के इतकी आहे.
शोभना कांबळे
रत्नागिरी : ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होऊ लागली आहे. आरोग्य विभागाकडून चाचण्या वाढविण्यात आल्याने तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासनाच्या मोहिमेची अंमलबजावणी प्रभावीपणे केल्याने रुग्णांचे निदान वेळेवर होत आहे. परिणामी उपचारासाठी रुग्ण वेळेवर दाखल होत आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने आता जिल्हा रुग्णालयात रेमडेसिवर इंजेक्शनची मागणी केवळ २३ टक्के तर जिल्ह्यात एकूण ३४ टक्के इतकी आहे.
जिल्ह्यात गणेशोत्सवानंतर कोरोना रूग्णांची संख्या भरमसाठ वाढली. या उत्सवासाठी आलेल्यांपैकी अनेक जण तपासणी न करताच घरी गेल्याने गंभीर रूग्णांचे प्रमाण वाढले. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात कोरोनाची रूग्णसंख्या वेगाने वाढून गंभीर रूग्णांचे प्रमाणही वाढले. लोक लक्षणे लपवू लागल्याने उशिरा उपचारासाठी दाखल होऊ लागले. त्यामुळे रूग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले.
गंभीर रूग्ण वाढताच जिल्हा रूग्णालयाला रेमडेसिवर इंजेक्शनचा साठा मोठ्या प्रमाणावर ठेवावा लागत होता. सुरूवातीला जिल्हा रूग्णालयाला रेमडेसिवर इंजेक्शन ५६०० रूपयांना एक याप्रमाणे खरेदी करावे लागले. सप्टेंबरमध्ये रूग्णसंख्या वाढल्याने या इंजेक्शनचीही गरज वाढली. मात्र, आता दिवसाला १० पेक्षाही कमी झाली आहे.
ॲंटिजेन टेस्ट, औषधसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध
ऑगस्ट महिन्यात महिला रूग्णालय, जिल्हा कोरोना रूग्णालय आणि इतर शासकीय रूग्णालयांमध्ये ५६२ रेमडेसिवर इंजेक्शन लागली. मात्र, सप्टेंबर महिन्यात भरमसाठ वाढलेल्या रूग्णांबरोबरच गंभीर रूग्ण वाढले. त्यामुळे ही संख्या १२२० इतकी झाली. वेळेवर निदान होऊ लागल्याने गंभीर रूग्णांची संख्याही घटली आहे. मात्र, रेमडेसिवर इंजेक्शनबरोबरच ॲटिजेन टेस्टसह इतर औषधसाठा जिल्हा रूग्णालयात पुरेशा प्रमाणात ठेवण्यात आला आहे.
१० इंजेक्शनची गरज
रेमडेसिवर इंजेक्शन कोरोनावर उपयोगी नसल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्याचवेळी जिल्ह्यात कोरोनाची रूग्ण घटल्याने जिल्हा रूग्णालयाने इंजेक्शनची खरेदी थांबविली. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक १२२० इंजेक्शने लागली. मात्र, आता दिवसाला १० पेक्षा कमी इंजेक्शने लागत आहेत.
कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असली तरीही अजून कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यासाठी रेमडेसिवर इंजेक्शन तसेच सर्व चाचण्या, औषधसाठा मुबलक प्रमाणात ठेवलेला आहे. नागरिकांनीही कोरोना गेला असे न समजता अजूनही काही महिने मास्क आणि सामाजिक अंतर आदी नियमांचे पालन करावे.
- डॉ. संघमित्रा फुले-गावडे,
जिल्हा शल्य चिकीत्सक