राजापुरातील आरक्षणाचा कोटा वाढवावा, रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 12:53 PM2020-02-21T12:53:47+5:302020-02-21T12:55:09+5:30
कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर तालुक्यातील महत्वपूर्ण अशा राजापूर रोड रेल्वेस्थानकात जनशताब्दीसह मंगला एक्स्प्रेस आणि अन्य गाड्यांना थांबे मिळावेत. तसेच या स्थानकातील आरक्षणाचा कोटा वाढवावा, यासाठी राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत व त्यांचे स्वीय सहाय्यक आदीनाथ कपाळे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे निवेदन दिले.
राजापूर : कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर तालुक्यातील महत्वपूर्ण अशा राजापूर रोड रेल्वेस्थानकात जनशताब्दीसह मंगला एक्स्प्रेस आणि अन्य गाड्यांना थांबे मिळावेत. तसेच या स्थानकातील आरक्षणाचा कोटा वाढवावा, यासाठी राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत व त्यांचे स्वीय सहाय्यक आदीनाथ कपाळे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे निवेदन दिले.
याच मुद्द्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवून राजापूर स्थानकात गाड्यांना दिला जाणारा थांबा व वाढीव कोटा याबाबतची मागणी केली आहे.
याबाबत पंचक्रोशी विकास समितीतर्फे माजी मंत्री व विधान परिषद सदस्य सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेण्यात आली. त्यावेळी सदाभाऊ खोत यांचे स्वीय सहाय्यक व तुळसवडे गावचे सुपुत्र आदिनाथ कपाळे उपस्थित होते.
राजापूर तालुक्यातील हे महत्वपूर्ण रेल्वेस्थानक असून, तेथे कोकणकन्या, मांडवी व तुतारीसह दोन पॅसेंजर गाड्या थांबतात. याव्यतिरीक्त अन्य गाड्यांना थांबे मिळत नसल्याने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वंचित राहावे लागत आहे.
या मार्गावरून दक्षिणेकडे गोवा, कर्नाटक, केरळ व तामिळनाळूसह आंध्रप्रदेश, गुजरात, दिल्ली, पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांकडे जाणारे प्रवासी प्रवास करतात. सध्या रत्नागिरी स्थानक हीच एकमेव सोय असून, चिपळूण, खेड आदी स्थानकात काही गाड्या नियमित किंवा क्रॉसिंगच्या निमित्ताने थांबतात. केवळ राजापूर स्थानकातच दूर पल्ल्याच्या गाड्यांना थांबे देण्यात आलेले नाहीत.
त्यामुळे या स्थानकात लांब पल्ल्याच्या मंगला लक्षद्वीप, नेत्रावती, केरळ संपर्क क्रांती एक्स्प्रेस, मंगळुरू, मत्स्यगंधा, करमाळी व नेत्रावती या गाड्यांना थांबे दिले जावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त राजापूर स्थानकात सध्या सात जागांचा कोटा असून, त्यामध्ये वाढ केली जावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
पाहणी करणार
हे निवेदन स्वीकारल्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी राजापूर रोड रेल्वे स्टेशनची पाहणी करून थांबा मिळणेबाबत आणि तिकीट कोटा वाढवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यावेळी दिले. यापूर्वीही पंचक्रोशी विकास समिती, राजापूर-मुंबईचे एक शिष्टमंडळ सेंट्रल रेल्वेचे असिस्टंट सेक्रेटरी उमंग दुबे यांना याचसंदर्भात भेटले होते. त्यांनीदेखील याबाबत सकारात्मकता दाखवली होती.
प्रवाशांची गैरसोय
कोकण रेल्वे मार्गावर लांब पल्ल्याचा थांबा असणाऱ्या गाड्यांना रत्नागिरीनंतर कणकवली किंवा कुडाळला थांबा असल्याने या मार्गावरील प्रवाशांना खूप धावपळ करावी लागते. राजापूर, विलवडे स्थानिक पट्ट्यातील प्रवाशांची गैरसोय होत असते. अनेकदा मुंबईहून कोकणात येणारे किंवा मुंबईकडे जाणारे प्रवासी या लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करु इच्छीतात. मात्र, इथे त्या गाड्यांना थांबे नाहीत.