रस्ता दुरूस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:30 AM2021-04-06T04:30:00+5:302021-04-06T04:30:00+5:30
शेखर निकम यांचा सत्कार देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील गुरववाडी तरूण मित्रमंडळातर्फे आमदार शेखर निकम यांचा सत्कार करण्यात आला. होळी ...
शेखर निकम यांचा सत्कार
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील गुरववाडी तरूण मित्रमंडळातर्फे आमदार शेखर निकम यांचा सत्कार करण्यात आला. होळी झाल्यानंतर श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात येते. मात्र, कोरोनामुळे शासकीय नियमावलीचे पालन करून साधेपणाने मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आमदार निकम यांना सन्मानित करण्यात आले.
एस. टी. स्थानकाची पाहणी
रत्नागिरी : लांजा बसस्थानक येथे प्रवासी निवाराशेड नसल्याने प्रवाशांना भर उन्हात एस. टी.ची प्रतीक्षा करावी लागते. प्रवाशांची गैरसोय विचारात घेत, आमदार राजन साळवी यांनी बसस्थानकाला भेट देऊन पाहणी केली. आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांच्याशी चर्चा करून निवाराशेड उभारण्याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
दीड हजार शिधापत्रिका रद्द
देवरूख : रास्त धान्याची उचल न केल्याने संगमेश्वर तालुक्यातील तब्बल एक हजार ६०० शिधापत्रिका शासनाने रद्द केल्या आहेत. सध्या तालुक्यात शिधापत्रिका अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे धान्य न उचलणाऱ्यांच्या शिधापत्रिकाच रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यानुसार कार्यवाही सुरू आहे.
पदवी प्रमाणपत्र प्रदान
दापोली : येथील वराडकर-बेलोसे महाविद्यालयात पदवी वितरण प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आले. मुंबई विद्यापीठाची पदवी प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. उच्चशिक्षण विभागाचे कोकण विभागीय सहसंचालक डाॅ. संजय जगताप यांचा यावेळी संस्थेच्या अध्यक्ष जानकी बेलोसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संजय लोखंडे यांना पुरस्कार
रत्नागिरी : जिल्ह्यातील ‘आदर्श ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पुरस्कार’ हातखंबा येथील ग्रामविकास अधिकारी संजय लोखंडे यांना जाहीर झाला आहे. लवकरच ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते लोखंडे यांना हा पुरस्कार देऊन गाैरविले जाणार आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षातील कामाच्या मूल्यमापनाचा आधार घेऊन राज्यातील एका ग्रामसेवकाची या पुरस्कारासाठी निवड केली जाते.
शिमगोत्सव साजरा
दापोली : तालुक्यातील दाभोळ गावातील भाविकांचे कुंभारवाडी येथील ग्रामदैवत चंडिका मंदिर देवस्थान ट्रस्टचा शिमगोत्सव कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन करून साधेपणाने साजरा करण्यात आला. शिमगोत्सवात वणाैशी ग्रामदेवता व दाभोळ ग्रामदेवता यांची तीन वर्षांतून एकदा भिवबंदर येथे पालखी भेट होते. यावर्षी पालखी भेट झाली मात्र रंगाची उधळण करण्यात आली नाही.
प्रबोधन वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद
दापोली : येथील दापोली शिक्षण संस्था संचलित ए. जी. हायस्कूल येथे शासनातर्फे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ करिअर मार्गदर्शनांतर्गत प्रबोधन वर्ग आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रा. कुणाल मंडलिक यांनी नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या विविध व्यवसाय उपक्रमांविषयी माहिती दिली.
पुस्तकांची भेट
राजापूर : राजापूर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गुरूवर्य द. ज. देशपांडे अध्यापक विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी कविवर्य अजय कांडर यांनी पुस्तकांची भेट दिली. विद्यालयाचे प्राचार्य मारूती कांबळे यांच्याकडे ही पुस्तके त्यांनी सुपूर्द केली.
पेपरची वेळ बदलण्याची मागणी
खेड : बारावी व दहावीची परीक्षा दिनांक २३ व २९ एप्रिलपासून सुरू होणार आहे. राज्यभरात एकाचवेळी ही परीक्षा होणार असल्याने परीक्षेचे वेळापत्रक भर उन्हाळ्यात आहे. त्यामुळे पेपरची वेळ बदलण्याची मागणी शिक्षक भारती संघटनेतर्फे करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना संघटनेतर्फे याविषयीचे निवेदन सादर करण्यात आले आहे.