बस सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:27 AM2021-04-03T04:27:23+5:302021-04-03T04:27:23+5:30
चिपळूण : तालुक्यातील भिले, केतकी भागणेवाडी हा भाग अतिशय दुर्गम असा आहे. या ठिकाणाहून विद्यार्थी, कामगार वर्ग, मजूर तसेच ...
चिपळूण : तालुक्यातील भिले, केतकी भागणेवाडी हा भाग अतिशय दुर्गम असा आहे. या ठिकाणाहून विद्यार्थी, कामगार वर्ग, मजूर तसेच अन्य प्रवाशांसाठी सकाळी बसची सुविधा होती. मात्र लॉकडाऊन काळात ही बस बंद केल्यामुळे या ग्रामस्थांचे हाल होत आहेत. ही बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
यशवंत विद्यालयाचे यश
आवाशी : खेड तालुक्यातील पंधरागाव विभाग जनता माध्यमिक शिक्षण संस्थेच्या यशवंत विद्यालयाची विद्यार्थिनी सिद्दी चाळके हिने जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत यश मिळविले आहे. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सदस्य द. ज. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा घेण्यात आली होती.
काजू कलमे खाक
देवरुख : शॉर्ट सर्किटने लागलेल्या वणव्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी बांदेवाडीतील आंबा काजू कलमे जळून खाक झाली आहेत. तीन ते चार किलोमीटर परिसरातील आंबा काजू कलमे जळल्याने बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुमारे ९०० झाडे या वणव्यात जळून खाक झाली आहेत.
आरे संघ विजयी
गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर येथील शिवदत्त वेळणेश्वर कबड्डी संघाने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय मॅटवरील कबड्डी स्पर्धेत श्रीराम दत्त सेवा संघ आरे या संघाने विजेतेपद पटकावले. फ्रेंड सर्कल खालचा पाट संघाचा पराभव या संघाने केला. या स्पर्धेत तालुक्यातील १६ संघ सहभागी झाले होते.
पुस्तकांची देणगी
राजापूर : तालुक्यातील जुवाठी, आनंदवन येथील अक्षरमित्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी विविध दानशूर व्यक्तींनी २२ स्कूलच्या आणि ७९ पुस्तकांची देणगी दिली आहे. सुनील बाणे, जुवाठीचे आत्माराम कदम, रुपेश रेडेकर, डॉ. एम. के. पाटील, रजनी मयेकर आदींनी ही देणगी दिली आहे.
रस्त्याचे काम निकृष्ट
खेड : तालुक्यातील निगडी बौद्धवाडीतील पूल आणि रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. दलित वस्तीच्या निधीतून हे काम होत असून हा निधी कशाही प्रकारे खर्च केला जात आहे. याबद्दल ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पुलाच्या कामाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
मोफत स्मार्ट कार्ड वाटप
सावर्डे : चिपळूण तालुक्यातील ओमळी नारदखेरकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेतर्फे ज्येष्ठ नागरिकांना मोफत स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले. विनोद महाडिक आणि प्रवीण झगडे यांच्यातर्फे मास्क व सॅनिटायझर यांचेही वाटप करण्यात आले.
पथदीप सातत्याने बंद
देवरुख : संगमेश्वर बाजारपेठेसह परिसरातील पथदीप सातत्याने बंद पडत आहेत. वारंवार दुरुस्ती करूनही पथदीप बंद होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्याच्या दुतर्फा उभारललेले हे पथदीप बंद असल्याने नागरिकांना अंधारातूनच जावे लागत आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभा
चिपळूण : चिपळूण तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. चेअरमन अशोक कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा आयोजित केली होती. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. तानाजीराव चोरगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गृहिणींना दिलासा
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅसच्या किंमतीत सातत्याने वाढ होत होती. मात्र १ एप्रिलपासून घरगुती गॅसची किंमत दहा रुपयांनी कमी होणार आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन या कंपनीने ही घोषणा केली आहे. त्यामुळे आता गृहिणींना दिलासा मिळणार आहे.