साैरदीप सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:28 AM2021-04-12T04:28:37+5:302021-04-12T04:28:37+5:30
बंधारा लवकर पूर्ण करावा रत्नागिरी : रत्नागिरी ते मिऱ्या किनाऱ्याला सलग्न असणारा मिऱ्या बंधारा गेले अनेक वर्षे पूर्ण न ...
बंधारा लवकर पूर्ण करावा
रत्नागिरी : रत्नागिरी ते मिऱ्या किनाऱ्याला सलग्न असणारा मिऱ्या बंधारा गेले अनेक वर्षे पूर्ण न झाल्यामुळे समुद्राचे पाणी अनेकांच्या घराच्या अंगणात येते. फेसाळणाऱ्या, उंच उडणाऱ्या लाटांनी संरक्षक बंधाराच फोडून टाकला आहे. त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची मागणी होत आहे. पावसाळा तोंडावर असल्याने नागरिकांनी लक्ष वेधले आहे.
सराफी व्यवसायावर परिणाम
रत्नागिरी : गुढीपाडवा सणाला सोने खरेदी केली जाते. मात्र लाॅकडाऊनमुळे सराफी व्यवसाय अडचणीत आला आहे. स्टाॅकवरील कराची रक्कम वाढत आहे. सोन्याचा वाढत जाणाऱ्या दरामुळे स्टाॅकवरील कराची रक्कमदेखील वाढत असून भरणे अवघड झाले आहे.
लिलाव प्रक्रिया बंदच
दापोली : कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील सर्व दुकाने व्यापाऱ्यांकडून बंद ठेवण्यात आली आहेत. मच्छीमारांनी मासेमारी नाैका समुद्रात लोटल्या नसल्याने हर्णे बंदरात होणारा मासळी लिलाव बंदच आहे. बंदरावर शुकशुकाट जाणवत आहे.
केळबाई यात्रोत्सव रद्द
रत्नागिरी : समस्त मयेकर बंधू मंडळ-मुंबई संस्थेतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा श्री केळबाई देवीचा वार्षिक जत्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. दरवर्षी मालवण तालुक्यातील वायरी येथील श्री केळबाई मंदिर येथे दि. १९ व २० एप्रिल रोजी वार्षिक जत्रोत्सव होणार होता. जिल्ह्यातून अनेक भाविक यात्रेसाठी उपस्थिती दर्शवित असतात. मात्र मंदिरच बंद असल्याने उत्सव रद्द करण्यात आला आहे.
काजू बोर्ड निर्माण करण्याची मागणी
रत्नागिरी : काजूचे उत्पादन कमी असून हंगाम सुरू झाला असला तरी काजूला हमीभाव दिला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. काजू किफायतशीर पीक असून काजू बोर्ड निर्माण करून हमीभाव जाहीर करण्यात यावा, अशी मागणी काजू उत्पादकातून होत आहे.
विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या शाळा क्रमांक ९ मधील गरीब विद्यार्थ्यांना नगरसेवक राजन शेट्ये, मधू घोसाळ, रशिदा गोदड यांच्या हस्ते टॅबचे वाटप करण्यात आले. नगरसेविका मीरा पिलणकर उपस्थित होत्या. नगर परिषदेकडून शहरातील १०० विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येत आहेत. ऑनलाईन शिक्षणासाठी याचा वापर होणार आहे.
चुकीचा मजकूर
मंडणगड : सार्वजिनक बांधकाम खात्याने वाहतुकीस उपयुक्त ठरतील व प्रवाशांना गावे, अंतराची माहिती देणाऱ्या फलक नूतनीकरणाची मोहीम घाईघाईत राबविली आहे. या मोहिमेत अनेक ठिकाणी नव्याने फलक लावण्यात आले असले तरी त्यामध्ये असंख्य चुका आहेत. त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
पालगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम
दापोली : सह्याद्री प्रतिष्ठानच्या दापोली, मंडणगड, खेड विभागांच्या समूहातर्फे पालगड किल्ल्यांवर स्वच्छता माेहीम राबविण्यात आली. किल्ल्यावर मध्यभागी असलेल्या पाण्याच्या टाकीतील माती काढून स्वच्छ करण्यात आली. मुख्य प्रवेशद्वारासमोरील, मध्यवर्ती भागातील झाडीझुडपे, गवत काढून टाकण्यात आले.
कविता लेखन स्पर्धा
देवरूख : साहित्यप्रेमी मंडळ, सोमेश्वर (बारामती) तर्फे राज्यस्तरीय खुली मराठी कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी स्वरचित एक किंवा दोन कविता पाठविण्याची सूचना केली आहे. विजेते प्रथम तीन क्रमांकासह उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना रोख रकमेची बक्षिसे दिली जाणार आहेत. दि. ३० एप्रिलपर्यंत कविता पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.