राजापुरात माेसम गावातून टॅंकरसाठी मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:33 AM2021-04-09T04:33:13+5:302021-04-09T04:33:13+5:30
राजापूर : गतवर्षी लांबलेल्या पावसामुळे यावर्षी आतापर्यंत पाणीटंचाईची झळ फारशी जाणवली नसली तरी दिवसागणिक वाढणाऱ्या तापमानामुळे जलस्त्राेतांमधील पाणी कमी ...
राजापूर : गतवर्षी लांबलेल्या पावसामुळे यावर्षी आतापर्यंत पाणीटंचाईची झळ फारशी जाणवली नसली तरी दिवसागणिक वाढणाऱ्या तापमानामुळे जलस्त्राेतांमधील पाणी कमी होऊ लागले आहे. त्यामुळे राजापूर तालुक्याला हळूहळू टंचाईचे चटके बसू लागले आहेत. सद्य:स्थितीत तालुक्यातील मोसम सरवणकरवाडी येथील ग्रामस्थांना टंचाईची झळ बसत असून, त्यांनी टँकरद्वारे पाणी पुरविण्याची मागणी पंचायत समितीकडे केली आहे.
राजापूर तालुक्याला दरवर्षी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. मुबलक प्रमाणात पाऊस पडला तरी राजापूर तालुक्याला लागलेले पाणीटंचाईचे ग्रहण मात्र वर्षानुवर्षे कायम आहे. दरवर्षी नवनवीन गावांची टंचाईग्रस्त म्हणून भर पडत आहे. ही पाणी समस्या दूर करण्याकरिता विविध योजनांच्या माध्यमातून शासनाकडून दरवर्षी कोट्यवधीचा निधी खर्च केला जातो. मात्र, तरीही पाणीटंचाईच्या स्थितीत फारसा फरक पडलेला नाही.
गतवर्षी तालुक्याला फारशी टंचाई जाणवली नव्हती. यावर्षीही परतीचा पाऊस चांगला झाला होता. शिवाय मधल्या काळात अवकाळी पावसानेही हजेरी लावलेली होती. त्यामुळे यावर्षी टंचाईची झळ काहीशी कमी बसेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तालुक्यातील मोसम सरवणकरवाडी येथील काही ग्रामस्थांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे.