रेल्वे थांब्याच्या मागणीची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:38 AM2021-09-24T04:38:01+5:302021-09-24T04:38:01+5:30
देवरूख : नेत्रावती व मत्स्यगंधा एक्स्प्रेसला संगमेश्वर येथे थांबा मिळावा, या मागणीची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतल्याची माहिती या लढ्याचे ...
देवरूख : नेत्रावती व मत्स्यगंधा एक्स्प्रेसला संगमेश्वर येथे थांबा मिळावा, या मागणीची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतल्याची माहिती या लढ्याचे प्रमुख संदेश झिमण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
संगमेश्वर रेल्वेस्थानक येथे नेत्रावती व मत्स्यगंधा एक्स्प्रेसला थांबा मिळावा यासाठी ‘निसर्गरम्य संगमेश्वर व निसर्गरम्य चिपळूण फेसबुक’च्या वतीने गेली दोन वर्षे मागणी करण्यात येत आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहारही करण्यात आला. मात्र, अधिकारी वर्गाकडून केवळ आश्वासने दिली जात असल्याने तीव्र नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. आक्रमक भूमिका घेत यापूर्वी दोन वेळा आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, वारंवार अधिकारीवर्गाने आश्वासने देऊन वेळ मारून नेल्याचे चित्र आहे. १५ ऑगस्ट रोजीचे उपोषण हे अधिकारीवर्गाच्या मध्यस्थीमुळे स्थगित करण्यात आले आहे.
रेल्वे प्रशासनाशी केलेला पत्रव्यवहार व मिळालेली उत्तरे याबाबतचा पत्रव्यवहार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात पाठविण्यात आल्याचे संदेश झिमण यांनी स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने या मागणीची दखल घेत संबंधित रेल्वेमंत्रालयाकडे योग्य ती कारवाई करण्याच्या सूचनेसह पत्र पाठविले असून, त्याची पोच आपल्याला प्राप्त झाल्याची माहिती संदेश झिमण यांनी दिली आहे. यामुळे मागणीची लवकरात लवकर पूर्तता होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.