राज्यपाल निवासस्थानासमोर धनगर बांधवांचे उपोषण
By admin | Published: July 16, 2014 10:32 PM2014-07-16T22:32:43+5:302014-07-16T22:41:40+5:30
४ आॅगस्टला ला जाणार, प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला इशारा
रत्नागिरी : मराठा आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण राज्यभर गाजत असताना आता धनगर समाज बांधवांनीही आक्रमक पवित्रा धारण केला आहे. आरक्षण मिळावे, यासाठी ४ आॅगस्टपासून राज्यपालांच्या शासकीय निवासस्थानासमोर धनगर समाज बांधवांनी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.
राज्य घटनेच्या कलम ३४२ खाली अनुसूचित जमातीतील यादीमध्ये हिंदी भाषेत धनगड व मराठी भाषेत धनगर हे दोन्ही शब्द एकाअर्थी आहेत. बिहार, हरियाणा, हिमाचलप्रदेश, पंजाब, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांनी धनगर जातीचा अनुसूचित जातीत समावेश केला आहे. मात्र, महाराष्ट्राने अजूनही धनगर समाजाला या जातीत समाविष्ट केलेले नाही. त्यामुळे समाजबांधव आता आक्रमक झाले आहेत. राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आपल्या समाजालाही आरक्षण मिळावे, यासाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. त्यासाठी ४ आॅगस्टपासून राज्यपालांच्या निवासस्थानासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे, असा इशारा कोकण विभागप्रमुख संभाजी पाटील व जयप्रकाश हुलवान यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
‘र’चा ड झाल्याने आरक्षण लांबले?
पेशवाईच्या काळात झालेला ‘ध’चा ‘मा’ सर्वश्रूत आहे. त्याच पद्धतीने धनगर समाजाला आरक्षण देताना ‘र’चा ‘ड’ झाल्याने हा समाज कित्येक वर्षांपासून अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित राहिला आहे. धनगर आणि धनगड ही एकच जात असलेला अहवाल शासनाने गेल्या ६५ वर्षांपासून नाकारल्याने आरक्षणावर गदा आल्याचे समाजबांधवांचे म्हणणे आहे.