रत्नागिरीत येत्या रविवारी शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन, सत्ता बदलानंतर पहिला मेळावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 07:02 PM2022-07-08T19:02:30+5:302022-07-08T19:02:53+5:30
आमदार उदय सामंत हे शिंदे गटात दाखल झाल्यानंतर होणाऱ्या पहिल्याच मेळाव्यात शिवसैनिक शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता
रत्नागिरी : राज्यातील सत्ता बदलानंतर येत्या रविवारी, (दि. १०) प्रथमच रत्नागिरी तालुक्यात शिवसेनेचा मेळावा आयाेजित करण्यात आला आहे. रत्नागिरी शहरातील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात हाेणाऱ्या या मेळाव्याला खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी, संपर्कप्रमुख सुधीर मोरे उपस्थित राहणार आहेत. तर आमदार उदय सामंत हे शिंदे गटात दाखल झाल्यानंतर होणाऱ्या पहिल्याच मेळाव्यात शिवसैनिक शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
शिवसेनेतील बंडाळीत रत्नागिरी विधानसभेचे आमदार उदय सामंत सहभागी झाल्यामुळे आता खासदार विनायक राऊत, उपनेते आमदार राजन साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने पुन्हा एकदा उभारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर दि. १० जुलै रोजी शिवसेनेच्या रत्नागिरी तालुक्याचा मेळावा आयाेजित करण्यात आला आहे. प्रत्येक जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणानुसार मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे. शिवसेनेच्या सर्व शाखाप्रमुख, विभाग प्रमुख, सरपंच यांनी शिवसैनिकांसह मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या मेळाव्यात आमदार राजन साळवी यांची शिवसेना उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याला खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांच्यासह सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याला शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, विधानसभा क्षेत्र संघटक प्रमोद शेरे यांनी केले आहे.