सेफ्टी बिलविरोधात निदर्शने
By admin | Published: December 16, 2014 10:09 PM2014-12-16T22:09:04+5:302014-12-16T23:36:26+5:30
महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना : दिल्ली येथे उद्या होणाऱ्या निदर्शनांसाठी सर्वत्र तयारी
रत्नागिरी : केंद्र शासनाच्या रोड ट्रान्सपोर्ट व सेफ्टी बिल २०१४ या नव्या कायद्यामुळे होणाऱ्या प्रतिकूल परिणामाच्या विरोधात दि. १८ रोजी नवी दिल्ली येथे महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेतर्फे निदर्शने करण्यात येणार आहेत. दिल्लीत सर्व कर्मचाऱ्यांना जाणे शक्य नसल्यामुळे आंदोलनाला पाठिंबा म्हणून दि. १८ रोजी आगार, युनिट, विभागीय, मध्यवर्ती कार्यालय, मध्यवर्ती कार्यशाळा येथे निदर्शने करण्यात येणार आहेत.
केंद्र शासनाने रोड ट्रान्स्पोर्ट व सेफ्टी बिल या नव्या कायद्यातील भाग ७ मध्ये प्रवासी वाहतुकीसंबंधात काही अमूलाग्र बदल सूचित केलेले आहेत. त्यामध्ये खासगी वाहतूक व एस. टी.सारखी सार्वजनिक वाहतूक याची गणना एकसारखी केलेली आहे. त्यामुळे सर्वच वैध व अवैध खासगी प्रवासी वाहनांना प्रवासी वाहतूक करताना एस. टी.सारखेच टप्पा वाहतुकीचे परवाने देण्याचे प्रस्तावित आहे. या निर्णयामुळे एस. टी. महामंडळाचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. एस. टी. महामंडळ अनेक वर्षे प्रवासी जनतेला सुरक्षित सेवा देत आहे. त्यालाही अडथळा निर्माण होणार आहे. या कायद्यात एस. टी. व अन्य सार्वजनिक उपक्रम आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी काही तरतुदी दिसून येत नाहीत.
या कायद्यातील भाग ७ मधील प्रस्तावित बदलांना संघटनेचा विरोध असल्याने केंद्र शासनाच्या संबंधित विभागाशी बैठकीचे आयोजन होणे आवश्यक आहे. महामंडळावर होणाऱ्या परिणामाच्या विरोधात एस. टी. कामगार संघटनेने दिल्ली येथे निदर्शने करण्याचे ठरविले आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे विभागीय सचिव शेखर सावंत, खजिनदार संदीप भोंगले, अविनाश तथा शेरू सावंत तसेच संघटनेचे अन्य पदाधिकारी आज दिल्लीकडे रवाना झाले आहेत. (प्रतिनिधी)