डेंग्यूचाही व्हायरस बदलतोय! सुदैवाने रत्नागिरीतील स्थिती अजून बरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:38 AM2021-09-24T04:38:07+5:302021-09-24T04:38:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : देशभरात डेंग्यूने थैमान घातले आहे. देश कोरोनाच्या संकटात असतानाच डेंग्यूने हाहाकार उडविला आहे. काही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : देशभरात डेंग्यूने थैमान घातले आहे. देश कोरोनाच्या संकटात असतानाच डेंग्यूने हाहाकार उडविला आहे. काही राज्यात कोरोना व्हायरसप्रमाणे डेंग्यूचा व्हायरसही आपले रूप बदलत आहे. सुदैवाने रत्नागिरी जिल्ह्यात रुग्णसंख्याही आटोक्यातच असून, त्याच्या विषाणूचे व्हायरसही बदललेले नाहीत. चालू वर्षी जानेवारी, २०२० पासून आजपर्यंत २१ रुग्ण सापडले आहेत.
सन २०२१ मध्ये जिल्हाभरातून डेंंग्यूच्या संशयित ६२ रुग्णांचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी केवळ १२ डेंग्यू पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. उर्वरित ९ रुग्ण हे सप्टेंबर महिन्यात चिपळूण तालुक्यात सापडलेले हे मजूर आहेत. तसेच चार तालुक्यामध्ये डेंग्यूचा एकही रुग्ण सापडलेले नाहीत.
———————
ताप नसताना पाॅझिटिव्ह
ताप नसताना डेंग्यूचे पाॅझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात कुठेही सापडलेले नाहीत. जिल्ह्यात डेंग्यूविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे. चिपळूण तालुक्यात परराज्यातून आलेल्या १९ मजुरांचे रक्तनमुने घेण्यात आले होते. त्यापैकी ९ नमुने डेंग्यू पाॅझिटिव्ह आले.
———————
जिल्ह्यातील डेंग्यूच्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या
तालुके रुग्ण
दापोली १
खेड ६
चिपळूण ९
रत्नागिरी ४
लांजा १
पॅथाॅलाॅजिस्ट म्हणतात
कोरोनासारखाच डेंग्यू व्हायरसही बदलत आहे. ज्या रुग्णांमध्ये कोणतीच लक्षणे नाहीत त्याचा अहवाल डेंग्यू पाॅझिटिव्ह तसेच ताप नसलेल्या रुग्णांचा अहवाल पाॅझिटिव्ह आहे, अशी स्थिती अनेक राज्यात आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात अशा प्रकारे डेंग्यू संशयित रुग्णांच्या रक्त नमुन्यांमध्ये सापडलेले नाही, असे येथील पॅथाॅलाॅजिस्टचे म्हणणे आहे.
व्हायरसमध्ये बदल नाही
कोरोनाप्रमाणे डेंग्यूच्या व्हायरसमध्येही बदल होत असल्याचे केवळ ऐकीवात येत आहे. मात्र, आपल्या जिल्ह्यात अजूनही एकाही डेंग्यूच्या रुग्णाचा अहवाल अशा प्रकारे आलेला नाही. त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही. तसेच जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्णही फार कमी आहेत.
- डाॅ. संतोष यादव, जिल्हा हिवताप अधिकारी,
रत्नागिरी