देवरूख आगार व्यवस्थाकाचे प्रक्षोभक वक्तव्य, गुन्हा दाखल न केल्याने महिलांचा पोलिस स्थानकातच ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 06:28 PM2022-02-04T18:28:34+5:302022-02-04T18:29:23+5:30
देवरूख : प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या देवरूख आगार व्यवस्थापक सागर गाडे यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी भाजपा कार्यकर्ते व सर्वपक्षीय महिलांनी ...
देवरूख : प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या देवरूख आगार व्यवस्थापक सागर गाडे यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी भाजपा कार्यकर्ते व सर्वपक्षीय महिलांनी देवरुख पोलिसांना निवेदन दिले होते. मात्र पंधरा दिवस उलटूनही त्यांच्यावर आजपर्यंत गुन्हा दाखल होऊ शकला नाही. यामुळे आक्रमक झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांसह, महिलांनी देवरुख पोलीस स्थानकात आज, शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले.
देवरुख आगार प्रमुख गाडे यांनी आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक विधाने केली होती. याचा व्हिडीओ देखील देवरुख पोलिसांना देण्यात आला होता. त्यांचे निलंबन व्हावे अशी मागणी करत तालुका अध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी निवेदने देत पत्रकार परिषद घेतली होती. यानंतर देवरूख पोलीस स्थानकात सर्वपक्षीय महिलांनी निवेदन दिले होते. याला पंधरा दिवस होऊन गेले आणि आगार प्रमुख हे रजेवरून सेवेत हजर झाले.
त्यांच्या वर काहीच कारवाई न झाल्याने भाजपसह सर्व पक्षीय कार्यकर्ते संतापले. यावेळी संतप्त महिलांनी दुपारच्या देवरूख पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला. यावेळी कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलिस स्थानकात ठिय्या मांडून राहणार अशी, भुमिका घेतली. आक्रमक झालेल्या महिलांना शांत करताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. नंतर वरिष्ठांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर २ तासांनी तक्रार घेण्यात आली.
गाडे यांनी काही ठराविक समाजाविषयी वक्तव्य केल्याने त्यांच्याबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि कॉंग्रेस अध्यक्षा यांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधाने केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यानंतर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. तर कारवाई न झाल्यामुळेच सर्वांनी पोलिस स्थानकात शुक्रवारी धडक दिली.