रत्नागिरीचे विभाग नियंत्रक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:24 AM2018-10-22T00:24:45+5:302018-10-22T00:24:49+5:30
रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अनिल मेहतर यांनी बुलडाणा परिवहन महामंडळात कार्यरत असताना लाचेची मागणी केली. त्यामुळे ...
रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अनिल मेहतर यांनी बुलडाणा परिवहन महामंडळात कार्यरत असताना लाचेची मागणी केली. त्यामुळे महामंडळाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंग देवोल यांनी निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. यंत्र चालन अभियंता विजय दिवटे यांच्याकडे विभाग नियंत्रकाचा पदभार तात्पुरता सुपूर्द केला आहे.
बुलडाणा परिवहन महामंडळात विभाग नियंत्रक म्हणून अनिल मेहतर कार्यरत असताना डिसेंबर २०१७ मध्ये १० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्यांच्यावर कारवाई केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदारांचे मामेभाऊ हे वाहन परीक्षक या पदावर बुलडाणा आगारामध्ये कार्यरत होते. त्यांची बदली बुलडाणा आगारातून विभागीय कार्यशाळा बुलडाणा येथे करावयाची होती. या अनुषंगाने विभागीय नियंत्रक अनिल दत्तात्रय मेहतर यांच्याकडे बदली करण्याची रीतसर मागणी केली होती; परंतु मेहतर यांनी बदली करण्यासाठी १० हजार रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदाराच्या मामेभावाने याला नकार दिला आणि याबाबत भावाला माहिती देऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तत्काळ चौकशी करून सापळा रचून मेहतर यांच्यावर कारवाई केली. या प्रकरणामुळे महामंडळाची प्रतिमा मलिन झाली. याबरोबरच लाचेची मागणी केल्याचा ठपका ठेवत महामंडळाने अनिल मेहतर यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. याबाबत अधिक चौकशी सुरू आहे. मात्र, सध्या रत्नागिरी विभागाचा पदभार यंत्र चालन अभियंता विजय दिवटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.