सभांना खातेप्रमुखांनी प्रतिनिधी पाठवू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:34 AM2021-04-23T04:34:00+5:302021-04-23T04:34:00+5:30
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या सभांना प्रतिनिधींना न पाठविता खातेप्रमुखांनी स्वत: उपस्थित राहावे, अशी तंबी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी नुकत्याच ...
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या सभांना प्रतिनिधींना न पाठविता खातेप्रमुखांनी स्वत: उपस्थित राहावे, अशी तंबी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत दिली. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत अध्यक्ष जाधव यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अध्यक्ष जाधव यांनी ही सभा ऑनलाईन घेतली. त्यामुळे ही सभा अडीच तासात आटोपली. चिपळूण तालुक्यातील खरवते येथील शेतकऱ्याच्या जळीत बागेच्या नुकसान भरपाईचा प्रश्न गेले सहा महिने गाजत आहे. ऑनलाईन सभेला कार्यकारी अभियंत्यांना उपस्थित राहण्याचे पत्र देण्यात आले होते. परंतु प्रत्यक्ष सभेला प्रतिनिधी बसले होते. त्यांनी मागील सभेप्रमाणेच उडवाउडवीची उत्तरे देत विषय टोलवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अध्यक्षांनी प्रमुख अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या.
ऑनलाईन बैठकीला संबंधित प्रमुख अधिकारी प्रतिनिधीच्या शेजारी बसलेले असतानाही उत्तरे देत नव्हते. ही बाब अध्यक्षांच्या निदर्शनास आली, तेव्हा अध्यक्ष चांगलेच संतापले. संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत एकप्रकारे सभाशास्त्रासह पदाधिकाऱ्यांचा अवमान आहे. तसे करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. जर असे कोणी करत असेल तर आम्हालाही काही अधिकार दिलेले आहेत, त्यांचा वापर करावा लागेल, अशा शब्दात अध्यक्षांनी तंबी दिल्याने संबंधित अधिकारी हडबडले. तसेच भविष्यात सर्वच खात्यांच्या अधिकाऱ्यांनी प्रतिनिधी न पाठवता स्वत: उपस्थित राहावे. अत्यावश्यक काम असेल तर माझी परवानगी घेतल्याशिवाय प्रतिनिधी पाठवू नका. तसे केल्यास येणाऱ्या प्रतिनिधीला सभागृहाबाहेर पाठवले जाईल, असा इशारा अध्यक्ष जाधव यांनी दिला.