भास्कर शेट्ये यांच्या जाण्याने वडिलकीचा आधार हरपला : अभिजित हेगशेट्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:38 AM2021-09-04T04:38:37+5:302021-09-04T04:38:37+5:30
रत्नागिरी : भास्करकाका यांचा फार मोठा भावनिक व वैचारिक आधार होता. त्यांच्या जाण्याने वडिलकीचा आधार हरपल्याची जाणीव झाली. नवनिर्माण ...
रत्नागिरी : भास्करकाका यांचा फार मोठा भावनिक व वैचारिक आधार होता. त्यांच्या जाण्याने वडिलकीचा आधार हरपल्याची जाणीव झाली. नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद सांभाळत त्यांनी मूल्याधिष्ठितेचा आधार नवनिर्माण चळवळीला दिला. त्यांच्या जाण्याने पोरकेपणाची जाणीव होत असल्याचे मत नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी व्यक्त केले.
येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेतर्फे विधानसभेचे माजी निवृत्त सचिव व माजी न्यायाधीश भास्कर शेट्ये यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून भास्कर शेट्ये विराजमान होते. संस्थेतर्फे आयोजित शोकसभेसाठी संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, संचालिका सीमा हेगशेट्ये, नवनिर्माण हाय सीबीएसई स्कूलच्या मुख्याध्यापिका नजमा मुजावर, डॉ. आशा जगदाळे उपस्थित होते. यावेळी अभिजित हेगशेट्ये यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अभिजित हेगशेट्ये पुढे म्हणाले की, रत्नागिरीतील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या उच्च शिक्षणानंतर न्यायमूर्ती शेट्ये यांची कारकीर्द अत्यंत वैभवशाली राहिली. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांनी विधिमंडळातील प्रधान सचिव पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. सर्व व्यापातून कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त पद सांभाळत साहित्य चळवळीला सन्मान मिळवून दिला. रत्नागिरीच्या सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक, सांस्कृतिक चळवळीचे नैतिक आणि वैचारिक आधार होते. त्यांच्या जाण्याने आधार कोसळला असल्याचे हेगशेट्ये यांनी स्पष्ट केले.