धाऊलवल्ली प्राथमिक शाळेची दयनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:22 AM2021-06-26T04:22:32+5:302021-06-26T04:22:32+5:30
राजापूर : तालुक्यातील धाऊलवल्ली गावातील प्राथमिक शाळा क्रमांक २ ची दयनीय अवस्था झाली आहे. शाळेची ही अवस्था पाहिल्यानंतर ...
राजापूर : तालुक्यातील धाऊलवल्ली गावातील प्राथमिक शाळा क्रमांक २ ची दयनीय अवस्था झाली आहे. शाळेची ही अवस्था पाहिल्यानंतर येथील ग्रामस्थ, शाळेत जाणारी मुले यांच्यामधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
याविषयी शासनाकडे व स्थानिक ग्रामपंचायत यांच्याकडे वेळोवेळी अर्जही करण्यात आले आहेत. या शाळेमार्फतही संबंधितांना पत्रव्यवहार केलेला असतानाही कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. त्यांना प्रत्यक्ष भेटून विनंत्याही करण्यात आलेल्या आहेत. या गंभीर विषयाची दखल घेऊन ‘धाऊलवल्ली शिवप्रेरणा ग्रामस्थ संघटना, मुंबई’ यांनीसुध्दा ग्रामपंचायत येथे सरपंच, ग्रामसेवक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विनंती अर्जही केलेला आहे. तरीही कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही. याबाबतीत विचारणा केली असता, ‘निधी पास झालेला आहे, बॉण्ड पेपर मिळत नसल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे’, असे कित्येक महिने सांगितले जात आहे.
आता पावसाळा जोरात सुरू आहे, शाळेचे छप्पर नादुरुस्त आहे, काही छप्पराचा भाग उडाला असताना येथील परिस्थिती काय असेल, आतील कागदपत्रे, बसण्याची जागा, इतर शाळेच्या महत्त्वाच्या वस्तूंची काय अवस्था झाली असेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने या विषयाकडे तातडीने लक्ष केंद्रीत करून तेथील विद्यार्थी, पालक, शिक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.