दापाेली नगरपंचायतीतील सफाई कर्मचारी पगारापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:21 AM2021-07-09T04:21:23+5:302021-07-09T04:21:23+5:30
दापाेली : दापोली नगरपंचायतीमध्ये काम करणाऱ्या अस्थायी व कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा पगारच नगरपंचायत प्रशासनाने न दिल्याने गुरुवारी ...
दापाेली : दापोली नगरपंचायतीमध्ये काम करणाऱ्या अस्थायी व कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा पगारच नगरपंचायत प्रशासनाने न दिल्याने गुरुवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष परवीन शेख यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सोमवार, दि. १२ जुलैपर्यंत सफाई कर्मचाऱ्यांचा पगार न दिल्यास दापोली शहरात भाजपतर्फे भीक मांगो आंदोलन करण्यात येईल व त्यातून जमा होणारी रक्कम नगरपंचायतीच्या प्रशासनाकडे पगारासाठी जमा करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
दापोली नगरपंचायत येथे सुमारे ६० ते ७० अस्थायी व कंत्राटी सफाई कर्मचारी असून, त्यांचा मागील दोन महिन्याचा पगार नगरपंचायतीने दिलेला नाही. कोरोनाच्या काळात कार्यरत असूनही त्यांना वेळेवर पगार दिला जात नसल्याची बाब माजी नगरसेवक संजय सावंत यांनी नगराध्यक्षा परवीन शेख यांना सांगितली. या कर्मचाऱ्यांना अत्यंत अल्प वेतन असून जर दोनदोन महिने त्यांना पगारच मिळत नसेल तर कोविडच्या काळात त्यांनी कुटुंबासाठी खर्च तरी कसा करायचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यासंदर्भात बोलताना नगराध्यक्षा परवीन शेख यांनी सांगितले की, राज्य शासनाकडून नगरपंचायतीला वेतनासाठी येणारे सहायक अनुदान वेळेवर येत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर देता येत नाही. शहरात विकासाची कोणतीही कामे सुरू नसताना तीन-तीन अभियंते नगरपंचायतीने कशासाठी घेतले आहेत याची विचारणा स्वरूप महाजन यांनी केली. कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरच सफाई कर्मचारी यांना पगार देण्यात येईल, असे नगरध्यक्षा परवीन शेख यांनी सांगितले. त्यावेळी दापोली नगरपंचायतीचा सर्व कारभार वरच्या मजल्यावरून (मुखाधिकारी यांच्याकडून) चालत असून, त्यावर नगराध्यक्ष यांचे नियंत्रण नसल्याचा आरोप संजय सावंत यांनी केला. यावेळी नगरसेविका जया साळवी, महिला मोर्चाच्या लीना शेठ, संदीप केळकर, अतुल गोंदकर, अजय शिंदे, स्वरूप महाजन, अॅड. ऋषिकेश भागवत, फझल रखांगे, संकेत कदम, शकील मणियार, कुणाल शिंदे, देवराज राठोड, दिप्तेश खटावकर उपस्थित होते.
------------------------------
आमदारांचाही विश्वास नाही
आमदार योगेश कदम यांनी मंजूर करून आणलेली शहरातील विकास कामे नगरपंचायतीकडे न देता ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहेत. दापोली नगरपंचायतीच्या कारभारावर खुद्द आमदारांचाच विश्वास नसल्याचे दिसून येत असल्याचे भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले.