चिपळूणमधील विद्यार्थी प्रवास भत्त्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 12:01 PM2021-11-19T12:01:54+5:302021-11-19T12:02:39+5:30
संदीप बांद्रे चिपळूण : सर्व शिक्षा अभियानांतर्गत कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत जाण्यासाठी वार्षिक तीन हजार रुपये ...
संदीप बांद्रे
चिपळूण : सर्व शिक्षा अभियानांतर्गत कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत जाण्यासाठी वार्षिक तीन हजार रुपये प्रवास भत्ता दिला जातो. मात्र, या प्रवास भत्त्याची मागणी करूनही निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे तालुक्यातील कमी पटसंख्या असलेल्या १८ शाळांमधील सुमारे ७० विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
ज्या शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. अशा शाळांचे इतर शाळांमध्ये समायोजन करून विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता दिला जाणार जातो. सर्व शिक्षा अभियानांतर्गत केंद्र शासनाकडून हा उपक्रम राबवला जातो. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. तूर्तास तालुक्यातील कमी पटसंख्या असलेल्या १८ शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा मुद्दा चिपळूण पंचायत समितीच्या सभेत चर्चेला आला होता. यावेळी पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे यांनी संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचे इतर शाळेत समायोजन करताना त्यांना मासिक तीन हजार रुपये प्रवास भत्त्याचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार शिक्षण विभागाला सूचना करण्यात आल्या आहेत.
याविषयी पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे यांनी सांगितले की, सर्व शिक्षा अभियानांतर्गत ६ ते १४ वयोगटातील बालकांना उपयुक्त व योग्य प्राथमिक शिक्षण देऊन शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे हा मुख्य उद्दिष्ट आहे. एखाद्या भागातील चार विद्यार्थी दोन किलोमीटर अंतरावर जात असतील, तर त्यांचे एकत्रित १२ हजार रुपये जमा होतील. ती रक्कम एखाद्या रिक्षा व्यावसायिकाला महिना एक हजार रुपये देऊन शिक्षणाचा लाभ घेऊ शकतात. तसेच त्यासाठी पालकांचीही मानसिकता तयार होऊ शकते. अन्यथा आपल्या लहान मुलांना इतक्या दूर अंतरावर पाठविण्यास कोणीही तयार होत नाहीत. ग्रामीण भागात हा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. याविषयी शिक्षण विभागाप्रमाणेच त्या-त्या विभागातील पालकांनी जागरुक होण्याची गरज आहे.
--------------------
वर्षभरापूर्वीच प्रस्ताव सादर
वर्षभरापूर्वीच डिसेंबर महिन्यात संबंधित विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. आजतागायत हा निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना स्वखर्चाने अथवा पायपीट करत शिक्षणाचा लाभ घ्यावा लागत आहे. तर काही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
----------------------
सर्व शिक्षा अभियानांतर्गत केवळ २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर एक किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर शाळा असलेल्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येतो. या अभियानांतर्गत तशी तरतूद आहे. मागील वर्षी कोरोनाच्या परिस्थितीमुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याची किंवा त्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्याची प्रक्रियाच पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास भत्त्याचा लाभ मिळाला नाही; मात्र डिसेंबर महिन्यात पुन्हा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
- दादासाहेब इरणाक, गटशिक्षणाधिकारी, चिपळूण.