विविध प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:20 AM2021-07-22T04:20:40+5:302021-07-22T04:20:40+5:30
दापोली : रत्नागिरी शिक्षक संघाने जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रश्नांवर जिल्ह्यातील सर्व आमदारांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला होता. त्यात चिपळूण तालुका ...
दापोली : रत्नागिरी शिक्षक संघाने जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रश्नांवर जिल्ह्यातील सर्व आमदारांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला होता. त्यात चिपळूण तालुका शाखेमार्फत आमदार शेखर निकम यांना निवेदन दिले होते. त्यावरील उचित कार्यवाहीसाठी त्यांनी हे पत्र संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे सादर केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन शिक्षक संघाने आपल्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या आहेत.
आमदार निकम यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी बदल्यांबाबत चर्चा केली असून, सर्व शिक्षक संघटनांच्या सूचनांचा विचार करून सर्व समावेशक बदल करण्यात येतील, असे आश्वासन मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. यावेळी मुख्यमंत्री कार्यालय, ग्रामविकास मंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्याकडे निवेदने देण्यात आली.
या भेटीदरम्यान सतीश सावर्डेकर, मनोज घाग, जिल्हा सरचिटणीस संदीप जालगावकर उपस्थित होते. शिक्षण सेवक प्रतिनिधी म्हणून मुंबई महानगरपालिका येथील गोकुळ घोगरे, राजकुमार सूर्यवंशी हजर होते. अजित पवार यांच्या भेटीसाठी व चर्चेसाठी आमदार शेखर निकम यांनी विशेष सहकार्य केले.
मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करू
सध्याची राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत घेऊन तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. शिक्षकांनी कोविड काळात विविध सेवा बजावून उत्तम काम केले असल्याचे आमदार निकम यांनी या बैठकीप्रसंगी आवर्जून स्पष्ट केले.
बीडीएस प्रणालीबाबत...
राज्याची बीडीएस प्रणाली बंद असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत, असे अजित पवार यांनी मान्य केले. त्याची आपल्याला पूर्ण कल्पना असून, ती लवकरच सुरू करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. इतर मुद्द्यांवर विचार करून निर्णय घेण्यात येतील, असे स्पष्ट केले.