खेड तालुक्यात पाण्यासाठी वणवण

By admin | Published: December 26, 2014 09:56 PM2014-12-26T21:56:44+5:302014-12-26T23:57:25+5:30

जलस्रोतांमध्ये घट : भीषण पाणी टंचाईची शक्यता कायम, नवे पर्याय उपलब्ध

Desalation to water in Khed taluka | खेड तालुक्यात पाण्यासाठी वणवण

खेड तालुक्यात पाण्यासाठी वणवण

Next

खेड : तालुक्यातील खेड्यापाड्यात दरवर्र्षी पाण्याची चणचण मोठ्या प्रमाणात भासते. विविध जलस्रोत उपलब्ध असताना तालुक्यात पाणीटंचाई भासते. निम्म्याहून अधिक जलस्रोत पूर्णपणे गाळात रूतले आहेत. लोकप्रतिनिधी व प्रशासनाला याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याने खेड तालुक्यात पाण्यासाठी आटापिटा केला जात आहे.
दरवर्षी कालबध्द आराखडा तयार करण्यात येतो. मात्र, वर्षानुवर्षे हा आराखडा राबविण्यात येत असला तरी अंमलबजावणीमधील अनेक त्रुटी व धोरणात्मक निर्णयाचा फटका तालुक्याला बसत आहे. त्याचाच परिणाम बहुतांश गावांत पाण्याचे साठे कमी होण्यात झाला आहे. हे साठे नियंत्रित करण्यासाठी पाणी वाचवा अभियान राबविणे आणि त्याप्रमाणे अंमल करणे आवश्यक आहे. यासाठी आतापासूनच उपलब्ध असलेले पाणीसाठे वाचविणे आवश्यक आहे.
खेड तालुक्यातील खेडेगावात ३२ गावांमध्ये जानेवारीपासूनच पिण्याच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष्य जाणवते. तर प्रतिवर्र्षी ४३ गावे आणि ६५ वाड्यांमध्ये ही पाणीटंचाई जाणवते. डोंगरदऱ्यातील गावांमध्ये ही समस्या अधिकच जटील झाली आहे. खवटी आणि देवाचा डोंगर तसेच तुळशीसारख्या ग्रामीण भागात जानेवारीपासूनच पाणीटंचाई उद्भवते. फेब्रुवारी महिन्यापासून तर या गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो. तालुक्यात नदी, ओढे, नाले व दऱ्या यांसारखे नैसर्गिक जलस्रोत उपलब्ध आहेत. मात्र, अनेक ठिकाणी गाळ आहे.
पाण्याची टंचाई असलेल्या गावांमध्ये व वाड्यांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या योजना आणि विहिरींच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याकडेच लोकप्रतिनिधींचा कल जास्त आहे. गेली १५ वर्षे येथील लोकप्रतिनिधीनी नैसर्गिक जलस्रोत विकसित करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले दिसत नाहीत़ खेड तालुक्यातील जगबुडी नदीसह इतर छोट्या - मोठ्या नद्यांकडेही तसे दुर्लक्षच झालेले दिसते. तालुक्यातील एकमेव मोठ्या असलेल्या जगबुडी नदीवरच पाणीटंंचाई काळात मोठा भार पडत आहे़
खेड शहराला पाणी पुरवठा करणारे बोरज धरण आजही आपल्या अस्तित्त्वासाठी धडपडत आहे. या धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. हा गाळ गेल्या १० वर्षांपासून काढण्याचे प्रयत्न खेड नगर पालिकेकडून होत आहेत. मात्र, लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि अपुऱ्या निधीमुळे बोरज धरण वर्षानुवर्षे गाळात रूतत चालले आहे. मात्र, यात नगरपालीकेतील सत्ताधाऱ्यांनी यामध्ये लक्ष घातले आहे. या धरणातील गाळ मोठ्या प्रमाणावर काढण्यात आल्याने आगामी काळात शहराला गरजेपुरते पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकेल. अठरा गाव धवडे बांदर विभागातून पावलेल्या जगबुडी नदीचा आणि शिरवली धरण व नातूवाडी धरणाच्या पाण्याचा सुकिवली येथे संगम झाला आहे. या तीन जलस्रोतांचे पाणी खेड शहरालादेखील पुरविले जात आहे. हेच पाणी पुढे खाडीपट्ट्यातील गावांना पुरविले जात आहे. साठे कमी झाल्यांनतर या भागातील जनतेला टँकरद्वारे उपलब्ध होणाऱ्या पाण्यावरच विसंबून राहावे लागत आहे़
संबंधित यंत्रणेने याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

विशेष प्रयत्नांची गरज...
जलस्रोतांच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न हवेत.
खेड तालुक्यात वर्षानुवर्षे परिस्थिती जै से थे
लोकप्रतिनिधी, प्रशासन यांच्यात ताळमेळ नाही.
जलस्रोतांच्या संरक्षणासाठी विशेष मोहीम आवश्यक असल्याने तसे प्रयत्न लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित.
नदी, ओढे, नाले यांसारख्या नैसर्गिक जलस्रोतांसाठी अधिक प्रयत्न गरजेचे.
टँकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या गावांची संख्या वाढतेय.
नळपाणी योजनांद्वारे गावात पाण्यासाठी प्रयत्न सुरू. मात्र, अनेक ठिकाणी अशा योजनांची अवस्था बिकट.
अनेक ठिकाणी गाळ तसाच.

Web Title: Desalation to water in Khed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.