तीन हजार लोकांची वणवण
By admin | Published: April 13, 2016 10:09 PM2016-04-13T22:09:06+5:302016-04-13T23:32:02+5:30
जिल्हा परिषद : आठ टँकर्सने पाणीपुरवठा सुरु
रहिम दलाल -- रत्नागिरी --जिल्ह्यात २१ गावांतील ३५ वाड्यांमधील २९२५ लोकांना भीषण पाणीटंचाईची झळ बसली असून, त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या टंचाईग्रस्तांना ८ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, तोही अपुरा पडत असल्याने लोक हैराण झाले आहेत. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त असले तरी येथील जमिनीमध्ये पाणी धरुन ठेवण्याची क्षमता नाही. कारण येथील जमीन जांभ्या दगडाची बनलेली असून, पडणारे पावसाचे पाणी नद्यांवाटे समुद्राला जाऊन मिळते. त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढणाऱ्या उष्म्याने पाण्याची पातळी खालावते. त्यामुळे विहिरी, नाले, झरे आटतात. कितीही पाऊस पडला तरी येथे उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई भेडसावते.मागील आठवड्यामध्ये जिल्ह्याच्या ४ तालुक्यांमध्ये ११ गावातील १८ वाड्यांना भीषण पाणीटंचाई जाणवत होती़ त्यामध्ये दापोलीमध्ये एका गावातील एक वाडीमध्ये, चिपळुणातील २ गावातील ४ वाड्यांमध्ये, खेडमध्ये ६ गावातील ११ वाड्यांना आणि लांजात २ गावातील २ वाड्यांचा समावेश होता.
या टंचाईग्रस्तांना प्रशासनाकडून ६ टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात होता. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्म्याचा परिणाम येथील पाणीसाठ्यावर होत असून, टंचाईग्रस्तांची संख्या वाढत आहे.
चालू आठवड्यात खेड तालुक्यामध्ये ४ गावातील ७ वाड्यांची टंचाईग्रस्तांमध्ये भर पडली आहे. मंडणगडमध्ये १ एका गावातील एका वाडीमध्ये आणि संगमेश्वर तालुक्यात ५ गावातील ८ वाड्यांमध्ये चालू आठवड्यामध्ये पाणीटंचाई सुरु झाली आहे. या टंचाईग्रस्तांना २ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्यात येत आहे.
या टंचाईग्रस्तांना शासनाकडून केवळ ८ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, तोही अपुरा पडत असल्याने या टंचाईग्रस्तांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. तसेच जनावरांचीही पाण्यासाठी तडफड होत आहे. त्यामुळे शासनाकडून टंचाईग्रस्तांना पुरेसा पाणी पुरवठा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
तसेच संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठी पावसाळ्यापूर्वीच उपाययोजना करणे आवश्यक आहे, जेणेकरुन पावसाच्या पाण्याचा वापर करुन उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात होऊ शकते.
वाढत्या उकाड्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे विहिरी, तलाव यांनी तळ गाठले आहेत. वाढणाऱ्या टंचाईग्रस्त वाड्यांमध्ये टँकरद्वारे पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी करण्यात येत आहे. मात्र, इतर बाबींसाठी पाणी कुठून आणावे, असा प्रश्न भेडसावत आहे.