इच्छुकांचे धाबे दणाणले

By admin | Published: June 14, 2016 11:19 PM2016-06-14T23:19:38+5:302016-06-15T00:07:46+5:30

नगराध्यक्ष निवड : जनगणनेच्या गणाप्रमाणे प्रभाग; आरक्षणेही बदलणार

Desperate throats | इच्छुकांचे धाबे दणाणले

इच्छुकांचे धाबे दणाणले

Next

राजाराम पाटील -- इचलकरंजी --नगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदाची आरक्षणे बदलण्याबरोबरच जनगणनेच्या गणनिहाय प्रभागरचना करण्याच्या हालचाली सुरू आहेत. जनतेतून नगराध्यक्ष आणि दोन नगरसेवकांचा एक प्रभाग होत असल्याने हे बदल होत असून, पूर्वीप्रमाणेच आरक्षणे गृहीत धरून तयारी करणाऱ्या इच्छुकांचे मात्र धाबे दणाणले आहेत.नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबर २०१६ मध्ये होत आहेत. आगामी निवडणुकांसाठी सन २०११ मधील जनगणनेनुसार नगरसेवकांची संख्या असल्याने नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाली आहे. यापूर्वी सन २०११ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये चार नगरसेवकांचा एक प्रभाग या पद्धतीने निवडणुका पार पडल्या, तर नगरसेवकांतून नगराध्यक्षांची निवड झाली.
आता बदललेल्या सरकारने निवडणूक पद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. दोन नगरसेवकांचा एक प्रभाग आणि नगराध्यक्षांची निवड जनतेतून करण्याची घोषणा केली. नगराध्यक्षांची निवड होण्याची पद्धती आणि कालावधी बदलल्याने नगराध्यक्षपदाची आरक्षणे बदलणार, असे निश्चित झाले. त्यासाठी
आता नगरविकास मंत्रालयाकडून नवीन नियमावली करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
जनगणनेच्या आधारे हे आरक्षण निश्चित केले जाणार असल्याने जुनी आरक्षणे आपोआपच रद्द होणार आहेत.
दरम्यान, नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाप्रमाणे काही इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली होती. त्यादृष्टीने प्रभागात आणि शहर पातळीवर काही कार्यक्रम आणि उपक्रम राबविले होते. निवडणूक आचारसंहितेपूर्वी लोकांच्या
नजरेत येण्यासाठी काही आंदोलनेही केली होती; पण नगराध्यक्षपदाची आरक्षणे पुन्हा बदलणार आणि जनगणनेतील गणाप्रमाणे नगरसेवकपदाच्या रचना असणार असे समजताच अशा इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. पुन्हा फेरजुळवणीसाठी तयारी करताना आता दमछाक होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.


जूनअखेरीस आरक्षण सोडती शक्य
नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाच्या सोडती नवीन नियमावली तयार झाल्यानंतरच काढल्या जातील. या नियमावलीविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. नियमावली पुढील आठवड्यात तयार होऊन सोडती जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निघतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यानंतरच नगरसेवकपदाची आरक्षणे काढण्यात येऊन जाहीर होतील.

Web Title: Desperate throats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.