पैसे असूनही चिपळूण पालिका कोरोना उपायांबाबत सुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:31 AM2021-04-21T04:31:52+5:302021-04-21T04:31:52+5:30
चिपळूण : नगर परिषदेकडे शासकीय निधी स्वरूपात ३५ लाख रुपये शिल्लक असतील, तर तो खर्च कधी करणार? त्यामध्ये कोरोना ...
चिपळूण : नगर परिषदेकडे शासकीय निधी स्वरूपात ३५ लाख रुपये शिल्लक असतील, तर तो खर्च कधी करणार? त्यामध्ये कोरोना केअर सेंटर का उभारले नाही, एखादी रुग्णवाहिका का घेतली नाही, अशा शब्दात उच्च तंत्र व शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी नगर परिषद प्रशासनाला खडेबोल सुनावले.
आहे. सध्या शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच शहरातील विविध भागांत मोबाइल रुग्णवाहिकेद्वारे नागरिकांची अँटिजेन तपासणी केली जात आहे. त्यामध्येही अनेकजण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. अशा परिस्थितीत लोकांना खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे नगर परिषदेने पुढाकार घेऊन कोरोना केअर सेंटर उभारण्याची होत आहे. तसेच शहरातील नागरिकांच्या सोयीच्यादृष्टीने नगर परिषद मालकीची एखादी रुग्णवाहिका असावी, अशीही मागणी होत आहे.
याविषयी मंत्री सामंत यांनी मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांना शासकीय निधी किती शिल्लक आहे, अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी ३५ लाख रुपये शिल्लक असल्याचे सांगितले. यावरून सामंत यांनी हा निधी खर्च कधी करणार, आतापर्यंत एखादी रुग्णवाहिका का खरेदी केली नाही, असे सवाल करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर याविषयी तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
सध्या शहरात तालुका आरोग्य विभागाच्या माध्यमातून तीन रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता नगर परिषदेची रुग्णवाहिका घ्यायची झाल्यास २४ तास सेवा देण्यासाठी तीन चालकांची तयारी ठेवावी लागणार आहे. तसेच कोरोना केअर सेंटरसाठी नगर परिषदेला एमडी डॉक्टर व अन्य सुविधा उभारावी लागणार असल्याने याविषयी कोणती कार्यवाही केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.