बेरोजगारी वाढली तरी १६० ग्रामपंचायतींत एकही काम नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:21 AM2021-06-10T04:21:50+5:302021-06-10T04:21:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकजण बेरोजगार झाले. मात्र, जिल्ह्यात सध्या सार्वजनिक कामे नसल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकजण बेरोजगार झाले. मात्र, जिल्ह्यात सध्या सार्वजनिक कामे नसल्याने केवळ वैयक्तिक कामेच सुरू असून, जिल्ह्यातील १६० ग्रामपंचायतींमध्ये यंदा एकही काम झालेले नाही.
जिल्ह्यात यंदा रस्ते, पूल आदींसारखी मोठी कामे रोजगार हमी योजनेंतर्गत झालेली नाहीत. कोरोनामुळे यावर्षी केवळ विहिरी, शोषखड्डे, घरकुले, आदी वैयक्तिक कामे करण्यात आल्याने अनेक छोट्या ग्रामपंचायतींमध्ये कामेच झालेली नाहीत.
जिल्ह्यात एकूण ८४६ ग्रामपंचायती आहेत. मात्र, सध्या मोठी कामे नसल्याने काही ग्रामपंचायतींच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेंतर्गत कामे झालेली नाहीत. यात १६० ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
कोरोनामुळे रोजगार हमी योजनेच्या कामावर काही परिणाम झाला नाही. पण जिल्ह्यात सध्या कुठलीच मोठी किंवा सार्वजनिक कामे नाहीत. जी आहेत ती शोषखड्डे, घरकुल, विहिरी यासारखी वैयक्तिक कामे असल्यानेच काही ग्रामपंचायतींकडून रोहयोंतर्गत कामे झाली तर काही ग्रामपंचायतींमध्ये यंदा कामाची निर्मिती झाली नाही.
- अमिता तळेकर, उपजिल्हाधिकारी, रोहयो, रत्नागिरी
फळबाग योजनेला प्रारंभ
रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात फळबाग लागवडीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यंदाही फळबाग लागवडीला या हंगामात सुरूवात करण्यात येणार आहे. ज्यांचे २ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र आहे, अशांनी ग्रामपंचायतीकडे किंवा कृषी सहाय्यकांकडे संपर्क करावा, असे आवाहन या विभागाने केले आहे.