बहुमत असूनही शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर-अस्वस्थ, खासदार सुनील तटकरेंनी लगावला टोला
By अरुण आडिवरेकर | Published: November 15, 2022 05:54 PM2022-11-15T17:54:23+5:302022-11-15T17:55:05+5:30
महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच पहिल्यांदाच एवढी अस्थिरता पाहायला मिळते आहे
रत्नागिरी : राज्यातील सरकारची अस्थिरतेकडे वाटचाल सुरु आहे. बहुमत असूनही हे सरकार अस्थिर आणि अस्वस्थ आहे. ज्यावेळी अस्थिरतेकडे वाटचाल होते, त्यावेळी पुढचे पाऊल हे मध्यावधी निवडणुका असू शकते. महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच पहिल्यांदाच एवढी अस्थिरता पाहायला मिळते आहे, असे मत खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत मांडले.
दिशा समितीच्या बैठकीसाठी खासदार सुनील तटकरे आज, मंगळवारी (दि.१५) रत्नागिरीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आमदार जितेंद्र आव्हाड हे गेली अनेक वर्षे सक्रिय राजकारणात आहेत. शरद पवारांच्या पुरोगामी विचारांचा पगडा त्यांच्या मनावर आहे. पोलिसांमार्फत जो काही प्रकार झाला तो दुर्दैवी आणि निषेधार्ह असाच आहे. विरोधी पक्षातील सक्षम नेत्यावर अशाप्रकारची कारवाई करणे म्हणजे सरकारच्या अस्थिरतेबाबत त्यांच्याच मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. म्हणूनच अशाप्रकरची आकसाची कारवाई करण्यात आल्याचा आरोप खासदार तटकरे यांनी केला. सरकारने याबाबत फेरविचार करावा, असेही ते म्हणाले.
मंत्री सत्तारांवर यापेक्षा कडक कारवाई झाली पाहिजे
राजकारणात आणि समाजकारणात मतमतांतर असू शकतात. प्रत्येकाची राजकीय विचारसरणी भिन्न असू शकते. संविधानाच्या माध्यमातून विरोधी पक्ष सक्षम असलाच पाहिजे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेला नाही. आपले विचार मांडण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. ज्यापद्धतीने गुन्हा नोंदविण्याची तत्परता दाखविण्यात आली. त्याउलट खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अत्यंत अश्लिल, हीन शब्दामध्ये राज्याच्या एका विद्यमान मंत्र्याने काढलेले उद्गार महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारे आहे. खरंतर कारवाई व्हायचीच असेल तर यापेक्षाही कडक कारवाई अब्दुल सत्तार यांच्यावर झाली पाहिजे, असे खासदार तटकरे म्हणाले.