लाेकांचे प्रश्न साेडविण्यासाठी कटिबद्ध : रिया कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:32 AM2021-04-04T04:32:31+5:302021-04-04T04:32:31+5:30
अडरे : मला आज जो सभापती पदाचा मान मिळाला आहे, तो आपल्या सर्व लोकांच्या पाठिंब्यामुळे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
अडरे : मला आज जो सभापती पदाचा मान मिळाला आहे, तो आपल्या सर्व लोकांच्या पाठिंब्यामुळे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे. याची मला पुरेपूर जाणीव असून, मला मिळालेल्या संधीचा सुयोग्य वापर करून लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहू, अशी ग्वाही चिपळूण पंचायत समितीच्या सभापती रिया कांबळे यांनी दिली.
चिपळूण पंचायत समितीच्या नवनियुक्त सभापती रिया राहुल कांबळे यांचा चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती तालुका चिपळूण या तालुका संस्थेतर्फे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना त्या बाेलत हाेत्या. सभापती पद ग्रहण केल्यानंतर नवनियुक्त सभापती रिया कांबळे चिपळुणातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात अभिवादन करण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती या संस्थेतर्फे त्यांचा संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना, चिपळूण तालुका हा सामाजिक व राजकीयदृष्ट्या प्रगल्भ विचारांचा असल्याने राजकीय क्षेत्रात बौद्ध समाजाला वेगवेगळ्या रूपाने संधी मिळत आहे. यापूर्वीही अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमधून नेतृत्व करण्याची संधी आमच्या संस्थेच्या सभासदांना मिळालेली आहे. पंचायत समिती सभापती पदाचा मानही आता रिया कांबळे यांच्या रूपाने मिळालेला आहे. त्यांनी आपल्या सभापती पदाच्या काळात सर्वसामान्य लोकांचे छोटी-मोठी कामे मार्गी लावावीत, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष व कवी राष्ट्रपाल सावंत, सुदेश गमरे, सचिव सुहास पवार, खजिनदार जगदीश कांबळे, हिशेब तपासनीस दिवाकर जाधव, शिक्षण समिती अध्यक्ष संदेश पवार, धम्म कमिटी अध्यक्ष अनंत पवार, न्यायदान कमिटी अध्यक्ष दिलीप मोहिते, संजय मोहिते, रत्नागिरी जिल्हा समाज कल्याण समितीचे माजी सभापती व तिसगाव विभागाचे अध्यक्ष मनोहर मोहिते, कळंबस्ते गावचे सरपंच विकास गमरे, माजी चिटणीस रमाकांत सकपाळ, राहुल कांबळे, राजू जाधव, नारायण जाधव, प्रदीप गमरे, प्रमोद कांबळे, सुभाष सावंत, सचिन मोहिते, सुप्रिया सावंत व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश पवार यांनी केले.