विलंबाने सुटणाऱ्या गाड्यांमुळे देवरूखवासीय त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:18 AM2021-03-30T04:18:19+5:302021-03-30T04:18:19+5:30
देवरुख : देवरुख आगारातून सोडण्यात येणाऱ्या बसेस विलंबाने सुटत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. आगाराच्या या कारभाराबद्दल ...
देवरुख : देवरुख आगारातून सोडण्यात येणाऱ्या बसेस
विलंबाने सुटत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. आगाराच्या या कारभाराबद्दल कमालीचा संताप व्यक्त होत आहे. वस्तीच्या गाड्या वेळेत
सोडण्यात याव्यात, याबाबत त्रस्त प्रवाशांनी निवेदनही दिले आहे. दरम्यान, टायरच्या कमतरतेमुळे गाड्यांच्या फेऱ्यांवर परिणाम हाेत असल्याचे सांगण्यात आले.
देवरुख आगारातून दिवसभरात सुमारे १४० बसफेऱ्या सोडण्यात येतात. याकरिता दिवसभर १४० बसेस ग्रामीण भागासह, शहरी भागात फिरत असतात. याकरिता तेवढेच मनुष्यबळही लागते. यापूर्वी मनुष्यबळाअभावी अनेक
चालक - वाहकांना डबल ड्युटी करावी लागत होती. हे अपुऱ्या कर्मचाऱ्यांचे
चक्रव्यूह संपतेय तोपर्यंत या आगारात सध्या विविध मार्गांवरील बसफेऱ्या
वेळेत जात नसल्याची ओरड सुरू झाली आहे.
शनिवारी तर तब्बल ३२ बस फेऱ्या सुमारे तासाभराच्या उशिराने साेडण्यात आल्या. नेहमीच बसेस उशिरा जाण्यामागचे कारण जाणून घेतले
असता सध्या देवरुख आगराला आवश्यक असणाऱ्या बसेसकरिता टायरची उपलब्ध
नसल्याची माहिती सातत्याने पुढे येत आहे. सुमारे पंचवीस ते तीस बसेससाठी
अत्यावश्यक असलेले टायर आणि विविध साधन सामुग्री उपलब्ध होत नसल्याचे
प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
या
सगळ्याचा परिणाम प्रवाशांना भोगावा लागत आहे. सकाळी बदडवाडीला जाणारी बस अनेक वेळा तासाभरापेक्षा अधिक उशिराने जात असल्याचे विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षकांनी सांगितले. गाडीला उशिर झाला की, हे शिक्षक नेहमीच आगाराशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, बहुतांश वेळा
संपर्कच होत नसल्याचीही तक्रार व्यक्त होत आहे. तसेच देवरुख - पांगरी -
रत्नागिरी मार्गावर धावणाऱ्या सायंकाळच्या बसेस दररोज उशिराने सुटत
आहेत. या पूर्वीची सुपर गाडी सुरू करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली हाेती. मात्र, त्यांच्या या निवेदनाला केराची टोपली दाखवली आहे.
याबाबत देवरुख येथील नायब तहसीलदार के. जी. ठाकरे, काेषागार अधिकारी, पुरवठा विभागाचे
प्रमुख तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांनी आमच्या प्रतिनिधीशी आगाराच्या या कारभाराबाबत व्यथा मांडल्या आहेत. यात काही सुधारणा झाली नाही तर आपण
वरिष्ठांना निवेदन देऊन रितसर तक्रार करणार असल्याचे सांगितले.