अत्यावश्यकऐवजी अन्य कामांना प्राधान्य दिल्याने विकासकामे प्रलंबित : योगेश कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:24 AM2021-07-17T04:24:45+5:302021-07-17T04:24:45+5:30
खेड : मागील काही वर्षांत अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अन्य कामांना प्राधान्य देण्यात येत असल्याने शहरातील अनेक विकासकामे प्रलंबित राहिली; ...
खेड : मागील काही वर्षांत अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अन्य कामांना प्राधान्य देण्यात येत असल्याने शहरातील अनेक विकासकामे प्रलंबित राहिली; परंतु यापुढे अत्यावश्यक कामांनाच प्राधान्य असेल. अत्यावश्यक कामे माझ्यापर्यंत घेऊन या ती तत्काळ पूर्ण करू, असे आश्वासन आमदार योगेश कदम यांनी येथे दिले.
शहरातील जगबुडी नदी किनाऱ्यावरील स्थानांतरण करण्यात आलेल्या विजेच्या रोहित्राच्या लोकार्पण कार्यक्रमावेळी ते बोलत होते. शहरातील मोहल्ल्यातील व खाडी किनारी राहणाऱ्या बांधवांना पावसाळी अतिवृष्टीमुळे शहरात पाणी भरल्यामुळे ट्रान्सफॉर्मर पाण्याखाली जात असल्याने परिसरातील विद्युत पुरवठा अनियमित काळासाठी बंद करण्यात येत असे. या कामासाठी आमदार योगेश कदम यांनी आमदार निधीतून दहा लाख रुपये निधी दिला व दोन्ही विद्युत रोहित्र स्थलांतर करण्यात आले.
यावेळी ते म्हणाले की, या रोहित्राबद्दल व त्यामुळे होणारा त्रास वर्षानुवर्षे होत होता. नगरपालिकेतून अत्यावश्यक बाब म्हणून हे काम करता आले असते; परंतु पालिकेत सध्या अत्यावश्यकच्या नावाखाली अन्य कामे होत आहेत. त्यामुळे हे काम माझ्याकडून करण्याची संधी मला मिळाली याचे मला मनस्वी समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या विकासात शिवसेना नेते रामदास कदम यांचे मोठे योगदान आहे. यावेळी त्यांनी खेड शहरासाठी बोटिंग, जॉगिंग, गार्डन, क्रोकोडाईल पार्क व पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक कामे केली जातील. त्यासाठी नगरविकास मंत्रालयाकडून ९ कोटींचा निधी मंजूर करून आणल्याचे सांगितले.
यावेळी तालुकाप्रमुख विजय जाधव, सभापती मानसी जगदाळे, शहरप्रमुख निकेतन पाटणे, उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, विभागप्रमुख स्वप्नील सैतवडेकर, जावेद कौचाली, लालू मुसा, नागेश तोडकरी, अरविंद तोडकरी, बिपीन पाटणे, मिनार चिखले, हनिफ घनसार, संजय मोदी, रईसा मुजावर, कार्यकारी अभियंता शिवतारे, सहायक अभियंता कुलकर्णी, शशिकांत चव्हाण, अण्णा कदम, अजिंक्य मोरे, प्रसाद बुटाला, कुंदन सातपुते, पराग चिखले, रामप्रसाद गिल्डा, प्रज्याेत तोडकरी, सिराज पटेल, हसनमियाँ रिफाईसर, फिरोज ढेणकर, नाझीर कौचाली, इौनुद्दीन कौचाली, शिवसेनेचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
----------------------------------
तुमच्या स्वप्नातील शहर बनविणार
खेड शहर सुंदर शहर, स्वच्छ शहर, माझे आवडते शहर करण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. त्यासाठी मला शहरवासीयांची साथ हवी आहे. तुमच्या स्वप्नातील खेड शहर बनविल्याशिवाय राहणार नाही, असेही यावेळी आमदार याेगेश कदम यांनी सांगितले.
---------------------------
खेड शहरातील जगबुडी नदी किनाऱ्यावरील विद्युत रोहित्राचे लोकार्पण आमदार योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.