पंचसूत्री कार्यक्रमातून विकासकामांना गती देणार : विक्रांत जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:22 AM2021-07-21T04:22:04+5:302021-07-21T04:22:04+5:30
मंडणगड : कोरोनामुळे जिल्ह्यातील विकासकामांची गती मंदावलेली असल्याने तिला अधिक गतिमान करण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रत्येक ...
मंडणगड : कोरोनामुळे जिल्ह्यातील विकासकामांची गती मंदावलेली असल्याने तिला अधिक गतिमान करण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रत्येक तालुक्याचा आढावा घेत प्रशासनास यथायोग्य सूचना दिलेल्या असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी मंडणगड येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी झीरो पेंडन्सी, मनरेगा, जलजीवन मिशन, तिसऱ्या लाटेचा आढावा व तयारी आणि विकासकामांचे प्रश्न यावर अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना सूचना दिल्याचे सांगितले.
या पत्रकार परिषदेला आमदार योगेश कदम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, सभापती स्नेहल सकपाळ उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबी पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. दुर्लक्षित म्हणून गणल्या गेलेल्या तालुक्यास न्याय देण्याचे काम करणार असल्याचे यावेळी सांगितले. असमतोल निधी वाटप झाल्याने तालुक्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत पत्रकारांनी छेडले असता, ते म्हणाले की, निधीचा अभाव व सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका पाळावी लागत आहे. आगामी काळात तालुक्यास जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यास अग्रक्रम देणार असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी जलजीवन मिशनमध्ये जिल्ह्यात मंडणगड तालुक्याचे काम एक नंबरवर असल्याचे सांगितले. आमदार योगेश कदम यांनी राबवत असलेला हळद लागवडीचा उपक्रम हा स्तुत्य असून, यामुळे नागरिकांना चांगला रोजगार मिळत आहे. पर्यटन विकासाबाबत बाेलताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्याला पर्यटन विकासासाठी म्हणावा तसा निधी उपलब्ध होत नाही. तरी आपण ‘क’ दर्जा पर्यटनामधून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.