गणेशोत्सवासाठी भक्त आतूर...!

By Admin | Published: September 4, 2016 11:24 PM2016-09-04T23:24:26+5:302016-09-04T23:24:26+5:30

मुंबईकर दाखल : खेड तालुक्यात गणरायांची संख्या वाढली; मूर्ती आणण्यास प्रारंभ

Devotees for Ganeshotsav! | गणेशोत्सवासाठी भक्त आतूर...!

गणेशोत्सवासाठी भक्त आतूर...!

googlenewsNext

खेड : गणेशोत्सवानिमित्त बहुसंख्य भक्तगण मुंबई, पुणे येथून कोकणात दाखल होत आहेत़ केवळ एका दिवसावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे मुंबईकरांसह कोकणवासीय गणरायाचे स्वागतासाठी सज्ज झाले आहेत़ खेड तालुक्यात १६ सार्वजनिक गणेशोत्सवांसह १२,९१७ घरगुती मिळून एकूण १२,९३३ गणरायांचे आगमन होणार आहे़ सोमवार, ५ सप्टेंबर रोजी गणरायांचे आगमन होणार असून, गणेशोत्सव काळात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे़
खेड तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत गणरायांची संख्यादेखील वाढली आहे. गतवर्षी एकूण १२,८९५ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती़ यावर्षी ही संख्या १२,९३३ वर पोहोचली आहे.़ घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवांचे प्रमाण वाढले असून, सार्वजनिक मंडळांमध्ये आरास करण्याबाबत चढाओढ पाहायला मिळत आहे़ तालुक्यातील १२,९३३ गणरायांमध्ये दीड दिवसांचे ८८८ घरगुती व सार्वजनिक १ तसेच पाच दिवसांचे घरगुती १०,०२० व सार्वजनिक १ तर वामन द्वादशीला विसर्जन होणारे घरगुती १८ गणपती आणि अनंत चतुर्थीदिनी घरगुती १९९७ व १४ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. खेड बसस्थानकातील दीड दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव वगळता उर्वरीत १४ गणपतींचे अनंत चतुर्थीला विसर्जन होणार आहे. (प्रतिनिधी)
गणपतीची आरास करण्याकरिता आवश्यक असलेले साहित्य आता बाजारपेठेत उपलब्ध असून, यामध्ये विविध आकर्षक मखरे, शामियाना, सूर्यप्रभा मुकूट, विविध फेटे आणि पगड्या, आदी बाजारात उपलब्ध आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खेड बाजारपेठेत गणेशभक्तांची खरेदीसाठी एकच झुंबड उडाली आहे.
गणेशभक्तांच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि होमगार्ड याबरोबरच जादा पोलीस कुमक मागविण्यात आली असून, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे़
चिपळूणमध्ये ३३ हजार
सुभाष कदम ल्ल चिपळूण
‘गणपती बाप्पा मोरया... आला रे आला गणपती आला...’चा जयघोष करत मोठ्या उत्साहात व वाद्यांच्या गजरात सोमवारी घरोघरी गणेशमूर्तींचे आगमन होणार आहे. चिपळूण तालुक्यात १७ सार्वजनिक तर ३३ हजार २० घरगुती गणेशमूर्तींची उद्या (सोमवारी) प्रतिष्ठापना होणार आहे. आज (रविवार)पासून गणेशमूर्ती आणण्यास प्रारंभ झाला असून, गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे.
ढोल-ताशे, बेंजोच्या तालावर आज (रविवार)पासूनच घरोघरी गणरायांचे आगमन सुरु झाले आहे. हातगाडीवरुन, टेम्पोतून किंवा खासगी गाड्यांमधून तर डोक्यावरुन गणरायाच्या मूर्ती आणल्या जात होत्या. ग्रामीण भागात मोठमोठे पाट घेऊन गणेशमूर्ती आणण्यासाठी लहान मुलांसह भक्तगण जाताना दिसत होते. अनेक गणेश चित्रशाळांमधून रविवारीच मूर्ती नेण्यात आल्या.
सोमवारी गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे. चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ सार्वजनिक तर १७ हजार २०० घरगुती गणेशमूर्ती स्थानापन्न होणार असून, अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ सार्वजनिक तर ५ हजार ५८० घरगुती गणरायांची प्रतिष्ठापना होणार आहे. सावर्डे पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ सार्वजनिक तर १० हजार २४० घरगुती गणेशांची स्थापना होणार आहे. गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र उत्साही वातावरण असून, महामार्गावरही वाहनांची वर्दळ वाढली आहे.

Web Title: Devotees for Ganeshotsav!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.