देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील शिवने गावामध्ये बिबट्याची दहशत कायम
By admin | Published: September 11, 2014 09:51 PM2014-09-11T21:51:31+5:302014-09-11T23:13:15+5:30
शिवने येथे संचार : महिन्यानंतरही ग्रामस्थ भीतीच्या छायेत
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील शिवने गावामध्ये शिंदेवाडीतील एका घरामध्ये बिबट्या शिरल्याच्या घटनेला महिना पूर्ण होतो न होतो तोच बिबट्याचा पुन्हा दिवसाढवळ्या मुक्त संचार वाढला आहे. यामुळे शिवने गावातील ग्रामस्थ अद्याप बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत.महिनाभरापूर्वी शिवने गावातील गजानन शिंदे यांच्या घरात बिबट्या शिरल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली होती. यावेळी बिबट्याला घरात कोंडून ठेवण्याचे धाड घरातील शिंदे यांनी केले. त्यानंतर अवघ्या तासाभरात वन विभागाचे कर्मचारी व पोलीस यंत्रणा शिंदेवाडीत दाखल झाली. तब्बल साडेसात तासांच्या मोहिमेनंतर बिबट्याला पकडण्यात यश आले नाही. स्वयंपाक खोलीतील छोट्याशा जागेतून बिबट्याने पलायन केल्याचे सकाळी निष्पन्न झाले होते.
या घटनेला महिनाभराचा कालावधी होतो न होतो तोच बिबट्याने दिवसाढवळ्या मुक्त संचारास सुरुवात केल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. यामुळे डोंगराळ भागातून तालुक्याच्या ठिकाणी येणारे ग्रामस्थ तसेच विद्यार्थीवर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या ४ दिवसांपासून सकाळी तसेच सायंकाळी बिबट्याची डरकाळी ग्रामस्थांच्या कानी पडत आहे. यामुळे ग्रामस्थांना सतर्क होतात. बुधवारी सायंकाळी दादासाहेब सरफरे विद्यालयातील विद्यार्थी विद्यालयातून परतत असताना डरकाळीच्या आवाजाने विद्यार्थी घाबरुन पळत सुटले.
या प्रकारामुळे शिवने गावात बिबट्याची दहशत कायम आहे. त्यामुळे धोका अजूनही टळलेला नाही. हा धोका लक्षात घेऊनच वनविभागाने पिंजरा लावून या बिबट्याला पकडावे, अशी मागणी शिवने गावातील शिंदेवाडीतील ग्रामस्थांनी केली आहे. (प्रतिनिधी)