देवरूखे ब्राह्मण जागतिक परिषद डिसेंबरमध्ये रत्नागिरीत, देवरुखेंची गणनाही होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 04:16 PM2018-08-08T16:16:32+5:302018-08-08T16:22:10+5:30
महाराष्ट्रासह देश - विदेशातील सर्व देवरूखे ब्राह्मण समाजाचे आकर्षण असणारी आगामी देवरुखे ब्राह्मण जागतिक परिषद १५ व १६ डिसेंबर रोजी रत्नागिरीत होणार आहे.
रत्नागिरी : महाराष्ट्रासह देश - विदेशातील सर्व देवरूखे ब्राह्मण समाजाचे आकर्षण असणारी आगामी देवरुखे ब्राह्मण जागतिक परिषद १५ व १६ डिसेंबर रोजी रत्नागिरीत होणार आहे.
देवरूखे ब्राह्मण परिषदेच्या नियोजनासाठी आढावा बैठक रत्नागिरीमध्ये घेण्यात आली. या सभेत सामाजिक भावनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. देवरूखे ज्ञाती बांधव उत्स्फूर्तपणे या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झाले होते.
या बैठकीत कार्यकर्त्यांना जागतिक परिषदेनिमित्त प्रकाशित केलेले निवेदन, जाहिरात फॉर्म, प्रवेश तिकिटे, पोस्टर्स, पोस्ट कार्ड इत्यादी गोष्टींचे सभासदांना वितरण करण्यात आले. जागतिक परिषदेची रूपरेषा व गठीत केलेल्या कार्यकारी समित्यांच्या कामांचा आढावाही यावेळी घेण्यात आला.
या परिषदेनिमित्त विविध सर्वांगिण उद्दिष्ट निश्चित करण्यात आली असून, सामाजिक क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठीत व्यक्तींचा सहभाग व मार्गदर्शन यानिमित्ताने लाभणार आहे.
तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेशही या परिषदेत असणार आहे. ही परिषद यशस्वी करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार कृतिशील पावले उचलण्यात येत आहेत. परिषदेच्या निमित्ताने सर्व देवरुखे जनांची गणना केली जात आहे. त्यासाठी
http://members.devrukhebrbrahman.com/Registration.php या संकेतस्थळावर जाऊन प्रत्येक ज्ञातीबांधवांनी त्यावर आपली नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या बैठकीला जागतिक परिषदेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर, रत्नागिरी देवरूखे संघाचे अध्यक्ष विनोद जोशी, परिषदेचे कार्यवाह सुरेश शितूत, सतीश शेवडे, राजू भाटलेकर, रामकृष्ण तायडे, सतीश काळे यांच्यासह विद्यार्थी सहाय्यक संस्थेचे व सर्व देवरूखे संस्थांचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भैरीबुवाला साकडे घालून
जागतिक परिषदेचे निमंत्रण व प्रवेशिका वितरणाची सुरूवात रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी देवाचे आशीर्वाद घेऊन करण्यात आले. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे उपस्थित होते. आतापासून या परिषदेबाबतचा प्रसार सुरू झाला आहे.