बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात रत्नागिरीत धरणे आंदोलन
By शोभना कांबळे | Updated: December 10, 2024 18:32 IST2024-12-10T18:30:13+5:302024-12-10T18:32:52+5:30
रत्नागिरी : बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा आणि इस्कॉनच्या सांधूंची तत्काळ मुक्तता व्हावी, या मागणीसाठी ...

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात रत्नागिरीत धरणे आंदोलन
रत्नागिरी : बांगलादेशातीलहिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा आणि इस्कॉनच्या सांधूंची तत्काळ मुक्तता व्हावी, या मागणीसाठी रत्नागिरीतील विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
या धरणे आंदाेलनाला रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि राजापूरचे आमदार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती. बांगलादेशाच्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी यावेळी स्वाक्षरी मोहीमही राबविण्यात आली.
बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्याक समाजावर अत्याचार होत आहेत. त्यांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. तेथील हिंदू महिलांवरही अमानवीय पद्धतीने अत्याचार होत आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयाेगाने याची दखल घ्यावी, स्वातंत्र्याच्या वेळी बांगलादेशमधील हिंदूंची संख्या ३८ टक्के होती. ती आता केवळ आठ टक्केच राहिली आहे.
त्यामुळे केंद्र सरकारने वेळीच पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. तसेच बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी आवश्यक ते उपाय तत्काळ अंमलात आणावेत आणि अटकेत असलेल्या बांगलादेशातील साधूंची त्वरित मुक्तता होण्यासाठी बांगलादेशी सरकारला निर्देश द्यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
या मागणीचे निवेदन विश्व हिंदू परिषदेच्या शिष्टमंडळातर्फे अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्याकडे देण्यात आले. आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत आमच्या या भावना पोहचवाव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी आमदार उदय सामंत, किरण सामंत, रूची महाजनी, सचिन वहाळकर, तसेच विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.