केंद्रप्रमुखांच्या मागण्यांसाठी २८ रोजी धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:37 AM2021-09-24T04:37:41+5:302021-09-24T04:37:41+5:30
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या केंद्रप्रमुखांच्या न्याय्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ, रत्नागिरी जिल्हा शाखा ...
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या केंद्रप्रमुखांच्या न्याय्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ, रत्नागिरी जिल्हा शाखा २८ सप्टेंबर, २०१२ रोजी रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करणार आहे. या धरणे आंदोलनाचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आंदोलनाचे निवेदन देण्यात आले.
केंद्रप्रमुखांच्या मागण्यांमध्ये केंद्रप्रमुखांना तांत्रिक सेवेत समाविष्ट करणे, वर्ग-२ ची पदोन्नती मिळणे, सेवानिवृत्तीच्या वेळी रजेच्या अर्जित रजेच्या रोखीकरणाचा लाभ मिळणे, अभावित केंद्रप्रमुखांना कायम करणे, कायमस्वरूपी प्रवास भत्त्यात सुधारणा करणे, केंद्रप्रमुखांच्या रिक्त जागा भरणे, केंद्रप्रमुखपदी पदोन्नती झाल्यामुळे अधिकार, कर्तव्य व जबाबदाऱ्या या बाबींमध्ये वाढ झाल्यामुळे केंद्रप्रमुखांना पदोन्नतीची एक वेतन वाढ देणे, केंद्रशाळांची पुनर्रचना करणे, महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाचा एक प्रतिनिधी प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीवर सदस्य म्हणून घेणे, सध्या केंद्रप्रमुखांच्या रिक्त जागांमुळे जादा केंद्राचा प्रभार असणाऱ्या केंद्रप्रमुखांना अतिरिक्त प्रभाराचे वेतन मिळणे, केंद्रप्रमुखांमधून दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन केंद्रप्रमुखांना गुणवंत केंद्रप्रमख पुरस्काराने गौरविणे आदींचा समावेश आहे.
या मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, शिक्षणाधिकारी वाघमोडे यांनाही सादर करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी शिर्के, सचिव सुनील जाधव, राज्य मुख्य संघटक विष्णुपंत पवार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.