हर्णै-गुहागर समुद्रात डिझेलची तस्करी करणारी बाेट जप्त, सीमा शुल्क विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 02:11 PM2023-02-11T14:11:11+5:302023-02-11T14:11:37+5:30

ही बाेट नेमकी काेठून आली याचा तपास सुरू

Diesel smuggling boat seized in Harnai Guhagar sea, Action by the Customs Department | हर्णै-गुहागर समुद्रात डिझेलची तस्करी करणारी बाेट जप्त, सीमा शुल्क विभागाची कारवाई

संग्रहीत छाया

Next

दापोली : डिझेलची तस्करी करणारी बाेट सीमा शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून हर्णै- गुहागर दरम्यानच्या समुद्रात पकडली. या बाेटीवरून सुमारे २४ हजार रुपयांचा डिझेल साठा जप्त करण्यात आला आहे. आयएनडी/एमएच/७/एमएम/२८५१ (साेन्याची जेजुरी) असे कारवाई केलेल्या बाेटीचे नाव असून, बाेटीच्या मालकाचे नाव कळू शकलेले नाही. ही कारवाई शुक्रवारी (१० फेब्रुवारी) सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली.

मागील महिन्यापासून समुद्रात परदेशी बोटींसाठी डिझेल तस्करी होत असल्याची माहिती सीमा शुल्क खात्याला मिळाली होती. काही दिवसांत ५० मेट्रिक टन डिझेलची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर रत्नागिरीतील सीमा शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला हाेता. हर्णै-गुहागर समुद्रात ४/५ नाॅटीकल माईलमध्ये दुपारी १:३० वाजता डिझेल भरून नेणारी बाेट अधिकाऱ्यांना दिसली. या बाेटीत तस्करीचे डिझेल असल्याच्या संशयावरून ही बाेट पकडून दाभोळ बंदरामध्ये आणण्यात आली. त्यानंतर बाेटीची तपासणी करण्यात आली.

या बाेटीची तपासणी केली असता बाेटीवर चार खलाशी असल्याचे पुढे आले. त्यांच्याकडे चाैकशी केली असता रात्री समुद्रात माेठ्या व्हेसलमधून डिझेल बाेटीत उतरून घेतल्याचे सांगितले. बाेटीची तपासणी केली असता बाेटीमध्ये एकूण १७ वेगवेगळे भाग आहेत. त्यातील दाेन भाग रिकामे असून, उर्वरित १५ भागांमध्ये डिझेलचा साठा सापडला. हा साठा सुमारे २४ हजारांचा असल्याचे तपासात पुढे आले आहे. ही बाेट नेमकी काेठून आली याचा तपास सुरू आहे. रत्नागिरी सीमा शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त अमित नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Diesel smuggling boat seized in Harnai Guhagar sea, Action by the Customs Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.