सही प्रकरणाला वेगळे वळण शक्य
By admin | Published: February 13, 2015 10:11 PM2015-02-13T22:11:37+5:302015-02-13T22:57:12+5:30
चौकशीची मागणी : खोटे दाखले देणारी टोळी असण्याची शक्यता
राजापूर : राष्ट्रीयत्त्वाच्या दाखल्यांवर प्रांताधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून ते वितरीत झाल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर, अनेकांचे धाबे दणाणले आहेत. असे खोटे दाखले देणारी टोळीच राजापूर तहसील व प्रांत कार्यालयाच्या आवारात कार्यरत असल्याचे बोलले जात असून, गेल्या वर्षभराच्या काळात अव्वाच्या सव्वा रक्कम घेऊन, अशा प्रकारे जातीच्या दाखल्यांसहित अनेक प्रकारचे शासकीय दाखले दिले गेल्याचे पुडे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संपूर्ण प्रकारात काही शासकीय अधिकारीही सामील असण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे, या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. प्रकरणी संशयित आशिष अरुण शिवणेकर याच्या विरोधात गुन्हा नोंद झाल्यानंतर आता राजापूर पोलिसांशी संबधित महा ई-सेवा केंद्र ३ची चौकशी सुरु केली असून, तेथील संपूर्ण दस्तऐवज ताब्यात घेतला आहे.
गेले अनेक दिवस प्रांतांंच्या खोट्या सह्या करून विविध प्रकारचे शासकीय दाखले दिले जात असल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. त्यातच बुधवारी प्रांत कार्यालयातच या खोट्या दाखल्यांच्या प्रती मिळाल्याने हे संपूर्ण प्रकरण बाहेर पडले होते. प्रारंभी या प्रकाराकडे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी हे प्रकरण पत्रकारांपर्यत पोहोचताच कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली . मात्र, प्रांत कार्यालयातील गोल शिक्का सहा महिन्यांपूर्वी चोरीला गेला होता व तोच शिक्का या प्रकरणात वापरला गेल्याचे निदर्शनास आले होते. त्याबाबत कठोर कारवाई करण्यास महसुल प्रशासन टाळाटाळ करत आहे. त्यामुळे, या प्रकरणात काही महसुली अधिकाऱ्यांचाही हात असल्याचा आरोप आता सर्वसामान्यांतून करण्यात येत आहे.
या महा ई-सेवा केंद्रातून हे दाखले वितरीत झाले तेथील काही कर्मचारी व तेथे आपल्या कामासाठी बसणाऱ्या काही जणांनी गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत विविध प्रकारचे दाखले लवकर मिळवून देण्यासाठी अव्वाच्या सव्वा रक्कम स्वीकारली असल्याचे मत व्यक्त होत आहे.
त्या गोल शिक्क्याबाबत महसूल प्रशासनाने घेतली असती, तर हा प्रकार घडला नसता असे काहींचे म्हणणे आहे. ही बाब त्यावेळी लक्षात येऊनदेखील प्रांंत कार्यालययाने ही बाब गांभिर्याने घेतलेली दिसत नाही. या प्रकरणाचे खरे स्वरुप बाहेर पडेल का, असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे.
या गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणातील संशयित आरोपी आशिष अरूण शिवणेकर याच्या विरोधात राजापूर पोलिसांत भा.दं.वि. कलम ४२०, ४६४, ४६६, ४६७, ४६८ प्रमाणे गुहा नोंद करण्यात आला असून, संबधित संशयित आरोपी फरार असल्याची माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन रामचंद्र काळे यांनी पत्रकारांना दिली आहे. (प्रतिनिधी)
राजापूर तालुक्यातील खोट्या सह्यांचे प्रकरण गाजत असतानाच, आता यामागे एक टोळी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. चौकशीची सुई कोणाकडे याकडे लक्ष.
महा ई-सेवा केंद्राच्या चौकशीकडेही लक्ष लागले असून, यामागे नक्की कोण आहे, याचा शोध घेण्याची मागणी केली जात आहे. चौकशीनंचर यामागचे सत्य पुढे येणार आहे.