चिपळूण तालुक्यातील अलोरे पाणीयोजना हस्तांतरणाला दिशा
By Admin | Published: August 28, 2014 09:04 PM2014-08-28T21:04:48+5:302014-08-28T22:23:45+5:30
अलोरे ग्रामसभा : अभियंत्यांच्या ठाम भूमिकेमुळे योजना ग्रामपंचायतीकडे
शिरगाव : चिपळूण तालुक्यातील अलोरे गावाला ग्रॅव्हिटीने पाणी पुरवठा करणारी योजना चार वर्षांपूर्वीच पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण केवळ तांत्रिक सल्ला, शासन नियम, मार्गदर्शन देण्याचेच काम करते. ग्रामपंचायत पाणी पुरवठा कमिटी व ग्रामपंचायत यांनीच समन्वयाने आपल्या गावच्या पाणी योजनेची सर्व जबाबदारी पाहायची असते, अशी ठाम भूमिका अभियंता एम. बी. जाधव यांनी ग्रामसभेत मांडली आणि योजना हस्तांतरणाबाबत प्रश्नाला ग्रामसभेत दिशा मिळाली आहे.
याबाबत जलसंपदा खात्याकडे पाठपुरावा करुन दीड कोटी रुपये खर्चाची योजना मंजूर करुन कार्यान्वित केली. २०१० साली ही योजना पूर्ण झाली. मात्र, आजअखेर ती ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आली नाही. त्यामुळे पाणीपट्टी आकारणी करता आली नाही. गेली चार वर्षे साडेतीनशे कनेक्शनधारकांना मोफत पाणी मिळत असल्याने हा विषय गांभीर्याने पुढे आला नाही. दि. २५ रोजी ग्रामसभेत विषय चर्चेला आल्यानंतर त्या पत्राचे वाचन झाले. आम्हाला या पत्राची माहिती का दिली नाहीत? असा सवाल अध्यक्ष गजानन चव्हाण यांनी विचारला. माझ्या कार्यकाळातलेच पाणी हिशोब आणि व्यवहार मला माहीत आहेत. मागच्यांनी काही लिहिले नाही तर पुढचे मी काय लिहू? असा सवाल ग्रामसेवक काळे यांनी केला.
योजनेचे सर्व लेखा परीक्षण करुन देण्याचे चव्हाण यांनी मान्य केल्यानंतर ही योजना गांभीर्याने अभ्यास करुन अगोदरच ताब्यात घेतली असती तर आज ग्रामपंचायतीला ६ लाख रुपये इतका महसूल मिळाला असता, अशी बाब निदर्शनास आणली गेली. मात्र, ही जबाबदारी कोणाची? यावर निर्णय न झाल्याने योजना चालू कशी होईल? हा धागा पकडत ग्रामसभेत यावर्षीपासून ३० रुपये प्रतिमाह पाणीपट्टी आकारण्याबाबत एकमत झाले आहे.
सदानंद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत शासनाच्या विविध योजना, त्यासाठीची पात्रता याबाबत चर्चात्मक निर्णय घेण्यात आले. १५ आॅगस्टच्या तहकूब ग्रामसभेतील अजेंड्यानुसार याच ग्रामसभेत शमशुद्दिन चिपळूणकर यांची दुसऱ्यांदा तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी सरपंच प्रकाश मोहिते, भीमराव जाधव, संदीप जाधव, अनंत सुर्वे, इकबाल मुल्ला, वसंत चिपळूणकर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)