राजापूर अर्बन बँकेचे संचालक इब्राहिम बलबले यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:21 AM2021-07-08T04:21:55+5:302021-07-08T04:21:55+5:30
राजापूर : समाजवादी विचारसरणीचे पाईक, राजापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान ज्येष्ठ संचालक इब्राहिम गफार बलबले (७७) यांचे ...
राजापूर : समाजवादी विचारसरणीचे पाईक, राजापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान ज्येष्ठ संचालक इब्राहिम गफार बलबले (७७) यांचे बुधवारी सकाळी जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. दहा दिवसांपूर्वी बलबले यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
मूळचे राजापूर तालुक्यातील साखरीनाटे गावातील रहिवासी असलले बलबले यांची समाजवादी नेते कै. भिकाजीराव चव्हाण यांचे पट्टशिष्य अशी ओळख होती. बलबले हे गेल्या ५० वर्षांपेक्षा अधिक काळ राजापूरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. कै. भिकाजीराव चव्हाण, कै. प्रा. मधू दंडवते यांच्यासोबत त्यांनी काम केले. तालुका पंचायत समितीचे उपसभापतीपदही त्यांनी भूषविले होते. तर भू विकास बँकेचे संचालक म्हणून तसेच कोकण नागरी बँक असोसिएशनचे संचालक व मानद सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले. काही वर्षांपूर्वीच त्यांनी काँग्रेस पक्षाची साथ धरली होती. राजापूर अर्बन बँकेवर गेली ३५ वर्षे ते संचालक म्हणून कार्यरत होते. तब्बल तीनवेळा त्यांनी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. गेली कित्येक वर्षे ते राजापूर शहरात माणिकवाडा परिसरात वास्तव्यास होते. मात्र, आपल्या मूळ साखरीनाटे गावाशी त्यांची नाळ कायमच जोडलेली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, पुतणे असा परिवार आहे. त्यांच्यावर रत्नागिरी येथे दफनविधी करण्यात आला.