कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात महिला रुग्णांची गैरसाेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:34 AM2021-08-28T04:34:43+5:302021-08-28T04:34:43+5:30
खेड : तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत स्त्रीरोगतज्ज्ञांसह एमडी फिजिशियनची जिल्हा आरोग्य प्रशासनाने प्रतिनियुक्तीवर वर्णी लावल्याने तालुक्यातील महिला रुग्णांची ...
खेड : तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत स्त्रीरोगतज्ज्ञांसह एमडी फिजिशियनची जिल्हा आरोग्य प्रशासनाने प्रतिनियुक्तीवर वर्णी लावल्याने तालुक्यातील महिला रुग्णांची गैरसोय होत आहे. ही ऑर्डर तातडीने रद्द करून पूर्वपदावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात नियुक्ती करावी, अशी मागणी होत असून, तसे न झाल्यास आक्रमक पवित्रा घेण्यात येईल, असा इशारा संतप्त महिलांनी दिला आहे.
मुंबई - गोवा महामार्गावरील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात शासनाने रुग्णांच्या सेवेसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ व एमडी फिजिशियनची नियुक्ती केली आहे. भरणे, कळंबणी, कशेडी, नातूनगर, खवटी, आपेडे, दिवाणखवटीतील महिलांना भेडसावणाऱ्या आजाराच्या निदानासह प्रसुतीवेळी सिझरसाठी उपयुक्त ठरत होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने स्त्रीरोग तज्ज्ञांसह एमडी फिजिशियनची प्रतिनियुक्तीवर अन्यत्र वर्णी लावून येथील महिलांवर अन्यायच केला आहे. यामुळे कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील महिलांना उपचारासाठी खेड शहरातील वैद्यकीय व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागत आहे. यासाठी आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरची आवश्यकता असतानाही अन्यत्र प्रतिनियुक्तीवर पाठवण्यामागे गौडबंगाल काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.