वसतिगृह प्रवेशापासून विद्यार्थी वंचित
By admin | Published: April 20, 2016 10:13 PM2016-04-20T22:13:01+5:302016-04-20T22:13:01+5:30
आयटीआय : आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत नाव आणि अभ्यासक्रमाचा समावेश नाही
रत्नागिरी : मागासवर्गीय विद्यार्थी शासकीय वसतिगृह आॅनलाईन प्रवेश प्रणालीमध्ये रत्नागिरीमधील दोन आणि चिपळूणमधील एक अशा तीन औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची नावे व अभ्यासक्रम समाविष्ट नसल्याने या संस्थेतील गरजू विद्यार्थ्यांना वसतिगृहापासून वंचित राहावे लागत आहे.
रत्नागिरी येथे मुलांसाठी तसेच मुलींसाठी स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. चिपळूण येथेही औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. या संस्थेतील विविध अभ्यासक्रमांमध्ये शिकणारी मुले ही ग्रामीण भागातून आलेली असतात. त्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर राहायचे कुठे? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसूनही यातील काही मुले ही भाड्याच्या खोलीमध्ये राहतात. हा प्रश्न मिटणार कधी? असा सवाल केला जात आहे.
रत्नागिरी शहरात समाजकल्याण विभागातर्फे मुलींसाठी एक आणि मुलांसाठी दोन अशी एकूण तीन वसतिगृह उभारण्यात आली आहेत. शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी गतवर्षी या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मुलांनी आॅनलाईन अर्ज भरले होते. परंतु, आॅनलाईन प्रणालीत या तीनही संस्थांची नावे व अभ्यासक्रम समाविष्ट न केल्याने या प्रणालीत ती दिसून येत नाहीत. त्यामुळे गतवर्षी सुमारे १०० विद्यार्थ्यांना वसतिगृहातील प्रवेशापासून मुकावे लागले होते.
समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने संपर्क करून ही अडचण त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर या कार्यालयाने पुणे येथील सहआयुक्त कार्यालयाकडे याबाबत वारंवार पत्रव्यवहारही केला. मात्र, पुणे येथील कार्यालयाकडून अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
आता निदान यावर्षी तरी या गरजू मुला - मुलींना या वसतिगृहाचा लाभ मिळावा, यासाठी सहआयुक्त कार्यालयाने दखल घेऊन या तिनही संस्थांची नावे आणि अभ्यासक्रम वसतिगृह प्रवेश आॅनलाईन प्रणालीत समाविष्ट करावा, अशी मागणी या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकडून करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)