शौचालयाअभावी रहिवाशांची गैरसोय
By admin | Published: November 30, 2014 09:45 PM2014-11-30T21:45:50+5:302014-12-01T00:18:20+5:30
प्रलंबित प्रश्न : उक्ताड रहिवाशांचा संताप
चिपळूण : घर तेथे शौचालय अशी सरकारची संकल्पना असली तरी नगर परिषद प्रशासनातर्फे काही भागात सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली आहेत. जागेचा अभाव असल्याने या सार्वजनिक शौचालयावरच काही भागातील नागरिकांना अवलंबून राहावे लागत आहे. उक्ताड येथील शौचालयाची दुरवस्था झाली असून, या दुरुस्तीकडे डोळेझाक होत असल्याबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे.
चिपळूण नगर परिषद प्रशासनातर्फे प्रत्येक प्रभागात सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या शौचालयाची देखभाल व दुरुस्ती नगर परिषद प्रशासन आजपर्यंत करीत आहे. घर तेथे शौचालय ही राज्य शासनाची संकल्पना असली तरी दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या जुन्या घरांना स्वतंत्र शौचालय बांधणे अवघड बनत आहे. सध्या नगर परिषद प्रशासन नवीन घर किंवा इमारत बांधताना प्रथम शौचालयाची व्यवस्था असेल तरच या घरांना अथवा इमारतींना परवानगी देत आहे. असे असले तरी काही भागात आजही सार्वजनिक शौचालये सुरु आहेत. उक्ताड येथे जुने सार्वजनिक शौचालय असून, या शौचालयाची दयनीय अवस्था झाली आहे. दरवाजे तुटले असल्याने महिलावर्गाला गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
उक्ताड शौचालयाची दुरुस्ती करण्याबाबत येथील रहिवाशांनी नगराध्यक्ष सावित्री होमकळस व मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांची भेट घेऊन निवेदनही दिले आहे. प्रशासनाकडून शौचालयाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ या प्रभागातील रहिवाशांनी उपोषणासारखा मार्गही अवलंबला. मात्र, गेल्या दोन वर्षात शौचालयाच्या दुरुस्तीबाबत कोणतीच हालचाल होत नसल्याने प्रभागातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शौचालयाअभावी महिलावर्गाची कुचंबणा होत आहे.
संबंधित यंत्रणेने या शौचालयाच्या दुरुस्तीबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर)
घर तेथे शौचालय संकल्पना
शौचालयाच्या दुरुस्तीबाबत मागणी करुनही चिपळूण नगर परिषद प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने नाराजीचा सूर.
स्वच्छ भारत अभियान उपक्रमात नगर परिषद प्रशासनाने सहभाग दर्शविला असला तरी सार्वजनिक शौचालयाबाबत उदासिनता.
शौचालयाचे दरवाजे तुटले असल्याने महिलावर्गात नाराजी.
दयनीय अवस्था सुधारण्याची मागणी.