चिपळुणात महापुरानंतरही आपत्ती सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:26 AM2021-07-25T04:26:40+5:302021-07-25T04:26:40+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : पुराच्या तडाख्याने चिपळूण उद्ध्वस्त झाल्यानंतरही येथे आपत्तीची मालिका सुरूच आहे. एकीकडे महापुरात वाशिष्ठी नदीवरील ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : पुराच्या तडाख्याने चिपळूण उद्ध्वस्त झाल्यानंतरही येथे आपत्तीची मालिका सुरूच आहे. एकीकडे महापुरात वाशिष्ठी नदीवरील दोन्ही पूल खचल्याने मुंबई-गोवा महामार्ग बंद पडला आहे. याच महामार्गावरील परशुराम घाटातील रस्ता खचला असून, दसपटी विभागातील तिवरे येथे डोंगराला भेगा गेल्या आहेत. तर याच भागातील रस्त्यावर दरड कोसळली असून स्वयंदेव, दादरचा साकवही खचला आहे.
ढगफुटीमुळे येथे महापुराची परिस्थिती निर्माण होताच महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. महामार्गावरील शेकडो वाहने कापसाळ व फरशी तिठा येथे थांबवली होती. त्यातच वाशिष्ठी नदीवरील बहादूरशेख नाका येथील ब्रिटिशकालीन पूल खचला व त्याचा भराव वाहून गेला. त्यामुळे महामार्गावरील वाहनांना एन्रॉन बायपास मार्गावरील पूल पर्याय होता. मात्र, वाशिष्ठी पुलापाठोपाठ हाही खचला. त्यामुळे महामार्गावरील वाहनांचा मार्ग पूर्णतः बंद झाला आहे. आता पूर ओसरल्यानंतरही शेकडो अवजड वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी आहेत.
एकीकडे महामार्गावरील वाहतूक ठप्प असताना आता याच मार्गावरील परशुराम घाटात रस्ता खचला आहे. त्यामुळे या मार्गावर अडकलेली वाहनेही परत मागे नेणे कठीण झाले आहे. येथेही तातडीने चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या मदतीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. तसेच तालुक्यातील तिवरे येथे २ जुलै २०१९ रोजी धरण फुटीची भीषण घटना घडली होती. आता याच अतिवृष्टीमुळे डोंगराला तडे गेल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय दसपटी विभागातील रस्त्यावर दरड कोसळली असून, स्वयंदेव, दादरचा साकवही खचला आहे. त्यामुळे काही वाड्यांचा संपर्क तुटला आहे.
-------------------------------
महामार्ग २४ तासांत सुरू करण्याचे प्रयत्न
महामार्गावरील खचलेला वाशिष्ठी पूल २४ तासांत खुला करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पूल खचलेल्या ठिकाणी भराव व काँक्रिटच्या साहाय्याने बांधकाम करून हा मार्ग छोट्या वाहनांसाठी खुला केला जाणार आहे. तसेच नवीन पूल पंधरा दिवसांत खुला करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा राबवण्यात यावी, अशी सूचना तंत्र व शिक्षणमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग व ठेकेदार कंपनीस केली.
-------------------------
चिपळुणात पेट्रोल, डिझेल टंचाई
चिपळूण शहर हद्दीत एकूण सहा पेट्रोल पंप असून त्यातील एकमेव पंप सुरू असून, उर्वरित पंपात महापुराचे पाणी गेले आहे. त्यामुळे एकाच पंपावर ताण आला आहे. तूर्तास या पंपातून केवळ शासकीय यंत्रणेसाठी वापरला जात आहे. त्यामुळे खासगी वाहनांना पेट्रोल, डिझेल मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे बाहेरून आलेल्या वाहनांचा प्रश्न निर्माण झाला आहे.